"पारतंत्र्याची आणखी एक निशाणी पुसली गेली";नौदलाच्या नव्या चिन्हावरून देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

भारतीय नौदलाच्या ताफ्यात पूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत दाखल झाली आहे

Updated: Sep 2, 2022, 06:02 PM IST
"पारतंत्र्याची आणखी एक निशाणी पुसली गेली";नौदलाच्या नव्या चिन्हावरून देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया title=

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते कोचीन शिपयार्ड लिमिटेड येथे भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू आयएनएस विक्रांत (INS Vikrant) या विमानवाहू युद्धनौकोचे अनावरण करण्यात आलं. भारतीय नौदलाच्या ताफ्यात पूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत दाखल झाली आहे. यावेळी नौदलाच्या नव्या चिन्हाचेही अनावरण करण्यात आलं.

जुन्या ध्वजात तिरंग्यासोबत सेंट जॉर्ज क्रॉस (ब्रिटिशांचे प्रतीक) चिन्ह देखील ठेवण्यात आले होते.पंतप्रधानांनी याला गुलामगिरीचे प्रतीक म्हटले होते. मात्र नव्या ध्वजात छत्रपती शिवाजी महाराजांचे चिन्ह आहे. भारतीय नौदलाचे 'सम नो वरुण' हे ब्रीदवाक्य नवीन चिन्हावर कोरलेले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज नवीन ध्वजाचे अनावरण केले, ज्याच्या वरच्या भागामध्ये भारताचा राष्ट्रध्वज आहे. राष्ट्रीय चिन्हासह निळा अष्टकोनी आकार देखील आहे. नौदलाच्या ब्रीदवाक्यासोबत ते ढालीवर लावले आहे. "दुहेरी सोनेरी किनारी असलेला अष्टकोनी आकार महान भारतीय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिक्क्यामधून प्रेरणा घेतो, ज्यांच्या दूरदर्शी सागरी दृष्टीने विश्वासार्ह नौदल ताफा स्थापित केला," असे नौदलाने नवीन ध्वज प्रदर्शित करणाऱ्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

यानंतर सर्वच स्तरामधून या नव्या ध्वजाचे कौतुक करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही याबाबत अभिनंदन केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत आज प्रत्येक शिवभक्तासाठी, महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे, असे ट्विटमध्ये म्हटलं आहे.
 
"तिरंगा आणि राजमुद्रा...आज प्रत्येक शिवभक्तासाठी, महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. पारतंत्र्याची आणखी एक निशाणी आज पुसली गेली आणि त्याजागी आपल्या लाडक्या, जाणत्या राजाची, शिवछत्रपतींच्या राजमुद्रेच्या आकारातील नवी निशाणी स्थापित झाली!," असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

"भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले. आज आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. पण नौदलाच्या ध्वजात आजही ब्रिटिशांच्या राजवटीतील खुणा तशाच होत्या. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी पारतंत्र्याची प्रत्येक ओळख पुसली जावी, हा संकल्प केला होता. आज भारतीय नौदलाला नवा ध्वज प्राप्त झाला आणि त्याचे अनावरण मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले. सर्वात आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे, हा ध्वज तयार करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेत राजमुद्रेतून नवे चिन्ह साकारण्यात आले आहे," असेही फडणवीस म्हणाले.

"सागरी सुरक्षा आणि नौदलाची प्रथम निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने केली होती. अतिशय भक्कम आणि मजबूत असे नौदल त्याकाळात साकारण्यात आले होते. त्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण आणि शिवकार्याचा यथार्थ गौरव आज यानिमित्ताने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात झाला! जगभरातील शिवभक्त, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासाठी हा अत्यंत गौरवाचा क्षण आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, त्याच महाराजांच्या राजमुद्रेने नौदलाच्या ध्वजावरील पारतंत्र्याची शेवटची ओळख पुसली गेली," असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.