मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं सगळ्यात मोठी कारवाई केली आहे. देशाचा पैसा घेऊन पळालेल्या नीरव मोदीच्या ९ लक्झरी कार ईडीनं जप्त केल्या आहेत. याचबरोबर नीरव मोदीचे म्युचुअल फंड आणि शेअरही जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणातला दुसरा आरोपी मेहुल चोक्सी ग्रुपचेही कोट्यवधी रुपयांचे फंड जप्त करण्यात आले आहेत. ईडीची छापेमारी अजूनही सुरुच आहे. याआधी ईडीनं नीरव मोदीच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर छापेमारी करुन कोट्यवधीची संपत्ती जप्त केली.
#PNBScam: ED seized 9 luxury cars belonging to #NiravModi and his companies including one #RollsRoyce Ghost, two #MercedesBenz models GL 350 CDI, one #Porsche Panameras pic.twitter.com/PhsyhxeWOR
— Doordarshan News (@DDNewsLive) February 22, 2018
नीरव मोदीच्या ज्या कार जप्त करण्यात आल्या आहेत त्या सगळ्या लक्झरी कार आहेत. यामध्ये एक रोल्स रॉईस घोस्ट, २ मर्सिडिज बेंज GL 350 CDI, पोर्शे पनामेरा, ३ होंडा कार, एक टोयोटा आणि एक टोयोटा इनोव्हा या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.
ईडीनं नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी समूहाचे ९४ कोटी रुपयांचे शेअर्स आणि म्युचुअल फंड जप्त केले आहेत. यामध्ये नीरव मोदीचे ७.८० कोटींचे शेअर आणि म्युचुअल फंड तर मेहुल चोक्सी ग्रुपचे ८६.७२ कोटींच्या शेअर आणि म्युचुअल फंडाचा समावेश आहे.
सीबीआयनं अलिबागमधलं नीरव मोदीचं फार्म हाऊसही सील केलं आहे. हे फार्म हाऊस १.५ एकरमध्ये पसरलं आहे. या फार्म हाऊसमध्ये रोपन्या नावाचा बंगलाही आहे.
पीएनबीला ११,५०० कोटी रुपयांना चुना लावणाऱ्या नीरव मोदीच्या ठिकाणांवरुन ईडीनं ५.६४९ कोटी रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.