मुंबई : तामिळनाडूमधील कुंभकोणमजवळ दारासुरममध्ये 'एरावतेश्वर मंदिर' आहे. हे मंदिर युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. हे एक हिंदू मंदिर आहे, जे दक्षिण भारतात 12व्या शतकात बांधलं गेलं होतं. ऐरावतेश्वर मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. भगवान शिव येथे ऐरावतेश्वर म्हणून ओळखले जातात. असं मानलं जातं की, या मंदिरात देवतांचा राजा इंद्राचा पांढरा हत्ती ऐरावत याने भगवान शंकराची पूजा केली होती.
या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या पायऱ्यांवरून संगीताचे सुर ऐकू येतात. त्यामुळे हे मंदिर अगदी वेगळं मानलं जातं. मंदिराला धार्मिक महत्त्व तर आहेच, शिवाय ते प्राचीन वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहे. मंदिराचा आकार आणि भिंतींवर कोरलेली चित्रं भाविकांना आकर्षित करतात.
हे मंदिरही द्राविड शैलीत बांधलं गेलं. प्राचीन मंदिरात तुम्हाला रथाची रचना देखील दिसेल आणि वैदिक आणि पौराणिक देव इंद्र, अग्नि, वरुण, वायू, ब्रह्मा, सूर्य, विष्णू, सप्तमातृक, दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी, गंगा, यमुना यांची चित्रंही आहेत.
या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील पायऱ्या. मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक दगडी जिना आहे, ज्यातून प्रत्येक पायरीवर वेगळा आवाज येतो. या पायऱ्यांवरून तुम्ही संगीताच्या सात नोट्स ऐकू शकता. पायऱ्यांवरून चालत गेलो तरी सुर ऐकायला मिळतात.