नवी दिल्ली : भारतीय सेनेत सैनिक म्हणून महिलांनाही प्रवेश खुला झालाय. भारतीय सेनादलात पहिल्यांदाच महिलांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. ही प्रक्रिया ऑनलाईन नोंदणी पद्धतीनं पार पडणार आहे. सेनादलाचे प्रमुख बिपीन रावत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिलांना सेनादलात प्रवेश देण्याची घोषणा करून त्यासंबंधी पावलं उचलण्यास सुरूवात केली होती. तसेच जानेवारी महिन्यात पहिल्यांदा सेनेच्या पोलीस दलात महिलांना प्रवेश देण्याची घोषणा करण्यात आली होती. आता सेनेच्या अधिकृत वेबसाईटवर भरती प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. 'मिलिट्री पोलीस' या पदासाठी महिलांना प्रवेश दिला जाणार आहे.
या भरतीसाठी आजपासून अर्थात २५ एप्रिल २०१९ पासून प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर योग्य उमेदवारांची निवड करण्यात येईल. उत्सुक तरुणी आपला अर्ज ८ जून २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं भरू शकतात.
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून १०० पदं भरण्यात येणार आहेत. साधारण एकूण ८०० महिलांची 'मिलिट्री पोलीस' या पदावर नियुक्ती केली जाईल. यामध्ये प्रत्येक वर्षाला ५२ महिलांची निवड होईल.
- इच्छुक उमेदवाराचं वय १७ ते २१ वर्ष असावं
- शारिरीक क्षमतेमध्ये उंची १४२ सेमी, तर वय १७-२१ दरम्यान असावं
- इच्छुकांना अगोदर प्रवेश परीक्षा आणि फिजिकल एन्ड्युरन्स टेस्ट (पीईटी) पास करावी लागेल.
उमेदवार प्रत्येक विषयात ३३-३३ टक्के किंवा एकूण ४५ टक्के गुणांनी दहावी उत्तीर्ण असावी, अशी अट आहे
भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती सेनादलाच्या joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली होती. महिलांची भरती पीबीओआर (पर्सनल बिलो ऑफिसर रँक) पदांसाठी केली जाणार आहे. सेनादलातील महिला बलात्कार आणि गैरवर्तवणूक सारख्या प्रकरणांची चौकशी करतील. सेनापोलीस सैन्यदलाच्या तळासोबतच कॅन्टॉनमेन्ट भागाची देखरेख करतात. तसंच शांति आणि युद्धसमयी जवान आणि सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची जबाबदारी सेनापोलिसांवर असते. आत्तापर्यंत सेनेच्या मेडिकल, सिग्नल, एज्युकेशन आणि इंजिनिअरिंग कोरमध्ये महिलांची भरती केली होत होती. यानंतर महिलांना प्रत्यक्ष युद्धातही सहभागी करून घेण्यावर विचार केला जातोय. संरक्षण राज्य मंत्र सुभाष भामरे यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, सेनेत महिलांचा सहभाग ३.८० टक्के आहे तर वायुसेनेत १३.०९ टक्के आणि नौसेनेत ६ टक्के आहे.