मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांना रोजगाराच्या नावाखाली 'पकोडे' विकण्याचा सल्ला दिला. त्याला विरोधकांनी चांगलंच ट्रोल केलं... पण, तुम्हाला माहीत आहे का? एक तरुणानं समोसे विकण्यासाठी चक्का 'गूगल'ची नोकरी सोडली... आणि आज हा तरुण वार्षिक ५० लाख रुपयांपेक्षाही जास्त कमावतो. हा तरुण आहे मुनाफ कपाडिया... मुनाफनं केवळ जिद्दीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर इथवर मजल मारलीय.
मुनाफ कपाडियानं एका फेसबुक पोस्टमध्ये आपला हा संघर्ष मांडलाय. मी तो व्यक्ती आहे ज्यानं समोसे विकण्यासाठी गूगलची नोकरी सोडलीय, असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. मुनाफच्या समोसे विशेष लोकप्रिय आहेत ते मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये आणि बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये...
मुनाफनं एमबीएचं शिक्षण घेतलं त्यानंतर त्यानं काही कंपन्यांमध्ये नोकरीही केली... आणि त्यानंतर त्यानं परदेशाची वाट धरली. परदेशात काही कंपन्यांमध्ये मुलाखत दिल्यानंतर त्याला 'गूगल'मध्ये नोकरी मिळाली. काही वर्षांपर्यंत त्यानं गूगलमध्येही नोकरी केली... परंतु, आपल्याला यापेक्षा काहीतरी वेगळं करायचंय, असं वारंवार त्याला वाटत होतं... मग काय त्यानं परतीची वाट धरली.
त्यानंतर मुनाफनं भारतात येऊन 'बोहरी किचन' नावानं एक रेस्टॉरंट सुरू केलं. मुनाफच्या आईला नफिसा यांना टीव्ही पाहण्याची हौस आहे... विशेष म्हणजे टीव्हीवरचे फूड शोज.... त्यामुळे त्यांच्या हातालाही एक वेगळीच चव आहे, असं मुनाफ सांगतो. मुनाफनं आपल्या आईकडून काही टिप्स घेऊन फूड चैन सुरू केलं... त्यानं रेस्टोरंट सुरू केलं...
काही वर्षांतच मुनाफचं 'द बोहरी किचन' मुंबईतच नाही तर देशभरात प्रसिद्ध झालं... यामध्ये रेस्टॉरन्टची खासियत म्हणजे 'मटन समोसा'... 'द बोहरी किचन'च्या केवळ मटन समोसाच नाही तर मटन रान, नर्गिस कबाब, डब्बा गोश्त, करी चावल अशा अनेक डिश प्रसिद्ध आहेत...
गेल्या दोन वर्षांत रेस्टॉरन्टचा टर्नओव्हर ५० लाख रुपयांच्या घरात पोहचलाय. सोशल मीडियावरही या रेस्टॉरन्टची स्तुती पाहायला मिळते.