हैदराबाद : हैदराबादमध्ये एका समलैंगिक जोडप्यानं कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या साथीनं एका खास सोहळ्यामध्ये जीवनातील नव्या प्रवासाची सुरुवात केली.
एकमेकांना अंगठ्या देत त्यांनी या नात्यावर शिक्कामोर्तब केलं. बंगाली आणि पंजाबी अशा दोन्ही प्रकारचे विवाहसमारंभ यावेळी पार पडले.
गे कपलपैकी सुप्रियो हा कोलकात्याचा असल्यामुळे आणि अभय हा दिल्लीचा असल्यामुळं लग्नाचा थाट हा दोन संस्कृतींना दर्शवणारा होता.
हे लग्न म्हणजे तेलंगाणातील दोन पुरुषांचं पहिलंच लग्न ठरत आहे. सुप्रियो चक्रवर्ती आणि अभय डांग यांनी जवळपास 10 वर्षांपासूनचं आपलं नातं आता नव्या मार्गावर आणलं आहे.
आनंदी राहण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही, असाच सुरेख संदेश या लग्नामुळं सर्वांना या जोडीनं दिला आहे.
एलजीबीटीक्यू समुदायातील कार्यकर्त्या सोफिया डेविड यांनी हे लग्न लावून दिलं.
समाजातील बंधनांचे पाश झुगारत प्रेमाच्या नात्यावर धाडसी निर्णय घेत सहजीवनाच्या दिशेनं या जोडीनं नवं पाऊल टाकलं आहे. त्यांना गरज आहे ती म्हणजे समाजाची साथ मिळण्याची आणि आपलेपणाच्या भावनेची.
प्रेमाची ही परिभाषा काळानुरुप बदलली, समाजाच्या काही स्तरांत समलैंगिक जोडप्यांना स्वीकारलं. पण, आजही एक असा वर्ग आहे ज्यानं अद्यापही या जोड्यांना स्वीकती दिलेली नाही.
शारीरिक सुख, आकर्षण या साऱ्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा नाती आणि सहजीवनाच्या या संकल्पना आणखी प्रगल्भ होतील तेव्हाच परिस्थिती बदलेल, तोवर 'ये इश्क नही आसां, बस इतना समझ लो; इक आग का दरिया है और डुब के जाना है' असं म्हणतच जगायचं आहे.