नवी दिल्ली : महिलांवर होणारे अत्याचार काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. दररोज छेडछाड, बलात्कार, मारहाण यासारख्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. गेल्याच आठवड्यात छेडछाडीला कंटाळून दिल्लीतील एका तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता छेडछाडीला विरोध करणाऱ्या एका तरुणीला छतावरुन फेकल्याचा प्रकार समोर आला आहे.
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. शाहजहांपूरमधील तरुण एका तरुणीची छेड काढत होता. त्यावेळी या तरुणीने त्याला विरोध केला. मात्र, त्यानंतर आरोपी तरुणाने तरुणीला छतावरुन खाली फेकलं.
छतावरुन तरुणीला फेकण्यात आल्यानं ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्यापही आरोपी फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवियापूर गावात राहणाऱ्या शेरु नावाच्या आरोपीने तरुणीची छेड काढली. त्याला विरोध केल्याने शेरुने तरुणीला छतावरुन ढकलून दिलं.
छतावरुन तरुणी खाली पडल्याचं दिसताच स्थानिकांनी तिला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल केलं. पीडित तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.