8 Crore Dowry For Sister Wedding: हुंडा आणि हुंडाबळी या दोन्ही गोष्टी भारतामध्ये कायमच चर्चेत असतात. आजच्या 21 व्या शतकामध्येही भारतामध्ये हुंडा घेण्याची प्रथा ग्रामीण भागामध्ये दिसून येते. लग्न ठरवताना मुलीचे नातेवाईक मुलाला सोन्याबरोबर मौल्यवान वस्तू भेट म्हणून देतात किंवा थेट रोख रक्कम भेट म्हणून देतात. भारतामध्ये हुंडा देणे आणि घेणे कायद्याने गुन्हा आहे. असं असलं तरी आजही अनेक भागांमध्ये हुंड्याच्या स्वरुपात दिली जाणारी रक्कम आणि भेटवस्तू या मुलीचा संसार सुरु करण्यासाठी मुलीकडच्यांनी लावलेला हातभार अशा अर्थाने पाहिला जातो. भारतात कायदेशीर बंदी घालण्यासाठी हुंडाविरोधी कायदा 1961 साली संमत करण्यात आला. भारतीय दंडसंहितेनुसार हुंडा मागणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. असं असलं तरी भारतात ही प्रथा थांबल्याचं चित्र दिसत नाही. असाच हुंडा घेण्याचा एक धक्कादायक प्रकार राजस्थानमध्ये समोर आला आहे. या ठिकाणी भावांनी बहिणीच्या लग्नासाठी दिलेल्या हुंड्याची रक्कम पाहून अनेकांचे डोळे पांढरे पडलेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
राजस्थानमधील नागपूर जिल्ह्यामधील धिंगसारा गावातील 4 भावांनी आपल्या बहिणीच्या लग्नामध्ये मोठा हुंडा दिला. या हुंड्यामध्ये या चारही भावांनी एकत्रितरित्या दिलेल्या भेटवस्तू आणि रक्कम ही 8 कोटी 31 लाख रुपये इतकी आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये अशाप्रकारे मोठ्या रक्कमेचा हुंडा देणे काही नवीन नाही. स्थानिकांमध्ये अशा हुंड्याला मायरा असं म्हणतात. यापूर्वी या गावामधील कोणत्याही कुटुंबातील मुलीच्या लग्नामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हुंडा देण्यात आलेला नव्हता, असं गावकरी सांगतात. भनवारी देवी असं नवरी मुलीचं नावं असून तिचं लग्न 26 मार्च रोजी झालं. या लग्नामध्ये अर्जून राम मेहरिया, भागीरथ मेहरिया, उमेदजी मेहरिया आणि प्रल्हाद मेहरिया या 4 भावांनी तब्बल 8 कोटी 32 लाखांचा हुंडा दिला.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या हुंड्यामध्ये 2.21 कोटी रुपये रोख रकमेचा समावेश आहे. एकूण 63 एकरांहून अधिक जमीन या भावांनी बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला दिली आहे. यात 4 कोटी रुपये किंमत असलेली स्वत:च्या गावातील 100 बिगा (62.49 एकर) जमीन, अन्य एका गावी 50 लाख किंमत असलेली 0.62 एकर जमीनीचा तुकडा, 71 लाख मुल्याचं 1 किलो सोनं, 9 लाख 80 हजार मूल्याची 14 किलो चांदीचा समावेश आहे. तसेच 7 लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टरही या नवऱ्याला मुलीच्या भावांनी दिला आहे. नवऱ्या मुलाला मुलीच्या भावांनी एक स्कूटरही दिली आहे. याचप्रमाणे अन्न, धान्याच्या स्वरुपामध्ये या भावांनी नवऱ्याला एवढ्या गोष्टी दिल्या आहेत की शेकडो बैलगाड्या आणि ऊंटावरुन हे सामना मुलाच्या मूळ गावी पाठवण्यात आलं.