नवी दिल्ली : देशात एकच कर प्रणाली असण्याचा मार्ग मोकळा झालाय. १ जुलैपासून जीएसटी लागू करण्याबाबत सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे १ जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे.
नवी दिल्ली येथे जीएसटी परिषद झाली. यावेळी बैठकीत नव्या कर प्रणालीतील संक्रमण केलेल्या तरतुदी, परताव्यासह अनेक प्रलंबित नियमांना मंजुरी देण्यात आली. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी १ जुलैपासून जीएसटी लागू करण्यास सहमती दर्शवली आहे.
जीएसटी परिषदेने गेल्याच महिन्यात १२०० वस्तू आणि ५०० सेवांवर जीएसटी दर निश्चित केले होते. परिषदेने ५, १२, १८ आणि २८ टक्क्यांचे दर निश्चित केले होते. तसेच आज जीएसटी परिषदेने १५ वी बैठक बोलावली होती. त्यात सोने, कापड यासह सहा वस्तुंवरील कराचे दर निश्चित करण्यात येणार होते. मात्र, या बैठकीत सोन्यासह सहा वस्तूंचे कराचे दर निश्चित होऊ शकले नाहीत.