Trending News : सध्या देशभर बोर्डाच्या परीक्षा (Board Exam) सुरु आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा (SSC Board Exam) सुरु आहेत. यादरम्यान गुजरात बोर्ड परीक्षेच्या (Gujarat Board Examination) पहिल्याच दिवशी कच्छ जिल्ह्यात (Kutch District) एक अशी घटना घडली ज्याची सध्या सोशल मीडियावर (Social Medda) खूप चर्चा होतेय. गुजरात बोर्डाची दहावीची परीक्षा सुरु आहे. पण परीक्षेच्या पहिल्याच दिवशी एका वडीलांनी आपल्या मुलीला दुसऱ्याच परीक्षा केंद्रावर सोडलं. मुलगी परीक्षा केंद्रात गेल्यानंतर वडील तिथून निघून गेले. आतमध्ये गेल्यावर मुलगी आपला वर्ग आणि रोल नंबर शोधत होती, पण काही केल्या तिला आपला रोल नंबर दिसत नसल्याने ती मुलगी प्रचंड घाबरली.
पोलीस इन्स्पेक्टक आला धावून
परीक्षा केंद्रावर (Exam Center) उपस्थित असलेल्या एका पोलीस इन्स्पेक्टरची (Police Inspector) नजर त्या मुलीवर पडली, ती मुलगी कावरी-बावरी झाली होती. काहीतरी गोंधळ असल्याचं लक्षात येताच, त्या पोलीस अधिकाऱ्याने काय घडलं याची माहिती विचारली. त्या मुलीने आपला रोल नंबर मिळत नसल्याचं त्यांना सांगितलं. सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने त्या मुलीची मदत करण्याचा निर्णय घेतला. त्या मुलीचं परीक्षा केंद्र त्या शाळेपासून 20 किलोमीटर दूरीवर होतं. क्षणाचाही विलंब न करत त्या पोलीस अधिकाऱ्याने मुलीला पोलिसांच्या जीपमध्ये बसवलं.
भूज डिव्हिजनचे पीआय जेवी धोला असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून त्यांनी मुलीला लाल दिव्याचा सायरन वाजवत तिच्या परीक्षा केंद्रावर सोडलं. योग्य वेळेत पोहोचल्याने मुलगी पेपर देऊ शकली, विशेष म्हणजे तिचं महत्वाचं वर्ष वाचलं. पोलीस अधिकारी जेवी धोला यांच्या कामगिरीची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. गुजरातचे गृहा राज्य मंत्री हर्ष संघवी (Harsh Singhavi) यांनीही ट्विटरवर हॅट्सऑप लिहित जेवी धोला यांचं कौतुक केलं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
कच्छ हा गुजरातमधला सर्वात मोठा जिल्हा आहे. कच्छ जिल्ह्यातील गांधीधाममध्ये राहाणारी 10 वीची विद्यार्थिनी निशा जयंतीभाई सवानी पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचली. निशाचे वडील जयंतीभाई सवानी यांनी आपल्या मुलीला भूजमधल्या मातृछाया स्कूलमध्ये दुचाकीने सोडलं. परीक्षेच्या अर्धातास आधी सर्व विद्यार्थ्यांना शाळेत घेण्यात आलं. निशाही इतर मुलांप्रमाणे परीक्षा केंद्रीत गेली. निशा व्यवस्थित आत गेल्याने तीचे वडील तिथून निघून गेले. पण रोलनंबर तपासत असताना आपण चुकीच्या शाळेत आलो असल्याचं निशाच्या लक्षात आलं. घाबरलेल्या निशाला पाहून पीआई धोला यांनी तिला 20 किमी दूर असलेल्या वरसानी हायस्कूलमध्ये सोडलं.
पोलीस अधिकाऱ्याचं होतंय कौतुक
या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीआय जेवी धोला यांचं सर्वत्र कौतुक होतंय. त्या मुलीचं वर्ष वाया जाण्यापासून वाचल्याबद्दल आपण समाधानी असल्याचं जेवी धोला यांनी म्हटलंय.