लखनऊ : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत मशिदीवरील भोंग्यावरुन विधान केलं. राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना भोंग्यावरुन हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात लाऊडस्पीकरवरुन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्यासाठी भलेमोठे लाउडस्पीकर लावण्यात आले आहेत. इथे अजानच्यावेळेस मोठ्या आवाजात हनुमान चालिसाचं पठण केलं जातं. हे लाऊडस्पीकर घरांच्या गच्चीवर लावले आहेत. (hanuman chalisa is recited at time of ajan in varanasi after maharashtra)
या हनुमान पठणाचं धर्मनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काशीपर्यंत प्रचार झाला आहे. वाराणसीत श्रीकाशी विश्वनाथ ज्ञानवापी मुक्तिं आंदोलनच्यावतिने लाउडस्पीकर लावले आहे.
वाराणसीच्या साकेत नगर भागातील आंदोलनाचे अध्यक्ष सुधीर सिंह यांनी आपल्या घरापासून याची सुरुवात केली आहे. अजानच्या वेळी हनुमान चालीसा लाऊडस्पीकरद्वारे लावली जाईल. हिंदू-मुस्लिम यांच्यातील सलोखा बिघडवण्याचा आमचा हेतू नसल्याचं सुधीर सिंह यांनी स्पष्ट केलं.
"काशीमध्ये पहाटेपासूनच मंदिरांमध्ये वेदग्रंथांची रेलचेल असायची. तसेच पूजा आणि हनुमान चालिसाचे पठणही व्हायचे. मात्र दबावामुळे या सर्व गोष्टी थांबल्या", असं सिंह यांनी स्पष्ट केलं.
"ध्वनिप्रदूषणाचं कारण सांगत न्यायालयाने मंदिरातील कार्यक्रम आणि हनुमान पठण या धार्मिक विधी थांबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आम्ही आमच्या मंदिरातील लाऊडस्पीकर काढून टाकले आहेत. मात्र मशिदीवरही त्याच प्रकारे लाउडस्पीकर लागलेले आहेत. भल्या पहाटे साडे चार वाजता अजाणचा आवाज येतो", असं सिंह यांनी नमूद केलं.