नवी दिल्ली : (Indian Passport) भारतीय पासपोर्टची ताकद आता पहिल्यापेक्षाही जास्त वाढली आहे. ज्यामुळं आता जगाची बहुतांश भ्रमंती करणं तुमच्यासाठी सहज शक्य होणार आहे. कसं काय शक्य आहे हे? असाच प्रश्न तुम्हाला पडतोय ना? तर, हे आता शक्य झालं आहे. कारण, भारतीय पासपोर्ट हा आणखी वरच्या क्रमांकावर स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
जगातील सर्वात भक्तम अशा राष्ट्रांच्या पासपोर्टची यादी प्रसिद्ध करणाऱ्या हेनले पासपोर्ट इंडेक्स (Henley Passport Index)नं त्यांची नवी यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
हेनले पासपोर्ट इंडेक्स (Henley Passport Index)कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये एकूण 199 देशांचा समावेश असतो.
2021 मध्ये भारतीय पासपोर्ट या यादीमध्ये 90 व्या स्थानावर होता. पण, यंदा म्हणजेच 2022 च्या यादीत हा पासपोर्ट थेट 83 व्या स्थानावर पोहोचला आहे.
नव्या यादीमुळं हे सिद्ध होत आहे की, भारतीय पासपोर्ट हा आणखी महत्त्व मिळवून गेला आहे.
परिणामी आता पासपोर्ट धारकांना याचा थेट फायदा होताना दिसणार आहे. यापुढं भारतीय पासपोर्टधारक 59 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करु शकणार आहेत.
मागील वर्षापर्यंत 58 देशांमध्ये व्हिसाशिवाय जाता येत होतं. पण, आता मात्र आणखी एका देशाची भर पडली आहे.
60 देशांमध्ये प्रवास शक्य होता पण...
यादी जाहीर झाल्यानंतर भारतीय पासपोर्टच्या बळावर 60 देशांमध्ये प्रवास हा व्हिसाशिवाय करता येणार होता.
पण, अर्मेनियानं मात्र पासपोर्ट धारकांना व्हिसा आवश्यक असल्याचं सांगण्यामुळं आता हा आकडा 59 वर आला आहे.
IATA च्या मदतीनं जाहीर होते आकडेवारी
हेनले पासपोर्ट इंडेक्स, इंटरनॅशनल एयर ट्रांसपोर्ट असोसिएशन (IATA)कडून देण्यात येणाऱ्या आकडेवारीच्या बळावर जगातील सर्वात महत्त्वाच्या राष्ट्रांच्या पासपोर्टची यादी जाहीर करतं.