मुंबई : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत संपली आहे. इन्कम टॅक्स इंडियानुसार, 31 जुलै रोजी रात्री 11 वाजेपर्यंत एकूण 5.78 कोटी करदात्यांनी त्यांचे आयटीआर भरले होते. पण फक्त आयटीआर भरून काम चालणार नाही. आता करदात्यांना त्यांचे आयटीआर वेरिफिकेशन करावे लागणार आहे. इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरिफिकेशन (ITR Verification) संबंधित बदल करण्यात आला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने ITR पडताळणीची वेळ मर्यादा कमी केली आहे.
CBDT नुसार, आता 120 दिवसांऐवजी फक्त 30 दिवस ITR पडताळणीसाठी उपलब्ध असतील. CBDT ने आपल्या एका अधिसूचनेत ही माहिती दिली आहे. आयटीआर भरल्यानंतर त्याची पडताळणी आवश्यक आहे. त्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होत नाही. CBDT च्या अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की ITR दाखल केल्याच्या 30 दिवसांच्या आत वेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. या कालावधीनंतर कोणतीही पडताळणी केली गेली तर ती वैध राहणार नाही. अशा परिस्थितीत करदात्याचे नाव नॉन-फायलर्सच्या यादीत समाविष्ट केले जाईल.
अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की जर ITR डेटा इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत ITR पडताळणी सबमिट केली गेली, तर डेटा ट्रान्सफरची तारीख रिटर्न फाइलिंगची तारीख मानली जाईल. याबाबत विभागाने स्पष्ट केले आहे की, ही
अधिसूचना येण्यापूर्वी ज्यांनी रिटर्न भरले होते त्यांना 120 दिवसांचा कालावधी लागू असेल. पण हे नियम 29 जुलैनंतर आयटीआर भरणाऱ्यांना लागू होतील.
ई-व्हेरिफिकेशन कसे करावे
सीबीडीटीने 29 जुलै रोजीच ही अधिसूचना जारी केली होती. सीबीडीटीचा हा नियम ई-व्हेरिफिकेशन करणाऱ्यांसाठी आहे. जर एखाद्याला वेळेवर आयटीआर पडताळणी करता आली नाही, तर त्याने आयटीआर भरला नाही असे मानले जाईल.
करदात्यांना त्यांचा डेटा पुन्हा सबमिट करावा लागेल आणि 30 दिवसांच्या आत त्याची पडताळणी करावी लागेल. तुम्ही नेट बँकिंग, आधार ओटीपी, बँक खाते, एटीएम इत्यादीद्वारे आयटीआर सत्यापित करू शकता. 31 जुलैनंतर आयटीआर भरणाऱ्यांना लेट फी भरावी लागणार आहे.