Indian Railway : भारतीय रेल्वे विभागाच्या वतीनं कायमच प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत रेल्वेमार्ग, नवनवीन ट्रेन आणि तत्सम गोष्टींची आखणी केली. अशा या रेल्वे विभागाच्या वतीनं पुरवण्यात येणाऱ्या एक ना अनेक सोयीसुविधांचा लाभ दर दिवशी कोट्यवधी प्रवासी घेताना दिसतात. रेल्वे विभाग निर्धारित वेळापत्रकानुसार काम करत प्रवाशांपर्यंत सर्व सुविधा पोहोचवण्यासाठी प्रयत्नांत असताना अनेकदा अनावधानानं काही समीकरणं चुकतातही. आणि मग? मग होतो तो गोंधळ...
भारतीय रेल्वे विभागात आतापर्यंत असंख्य नावाच्या आणि तिकिटांच्या किमतीनुसार वेगवेगळ्या दर्जाच्या ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आहेत. एखादं धार्मिक स्थळ असो किंवा मग, एखादा प्रांत, भारतीय रेल्वेमध्ये असणाऱ्या ट्रेनची नावंही तितकीच रंजक. एखादी लांब पल्ल्याची रेल्वेगाडी तुमच्यासमोरून गेली असता नकळत तुम्हीही तिचं नाव वाचता. यावेळी हिंदी, इंग्रजी आणि स्थानिक भाषेमध्ये रेल्वेचं नाव लिहिलं असल्याचं तुमच्या लक्षात येतं.
बहुविध नावांच्या याच रेल्वेंच्या यादीत सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे Murder Expressची. तुम्हालाही बसला ना धक्का? या घातक नावामुळे सध्या प्रवाशांनीही संताप व्यक्त केला आहे. काहींना तर, हे नेमकं काय सुरुये याचाही अंदाज येत नाहीये.
विविध भाषांमध्ये रेल्वेची नावं लिहीताना भारतीय रेल्वेकडून अनावधानानं एक मोठी चूक झाली आणि त्यामुळं आशिया खंडातील या चौथ्य़ा सर्वात मोठ्या रेल्वे विभागाची तारांबळही उडाली. रेल्वे विभागाकडून स्थानिक भाषेमध्ये हटिया-एर्नाकुलम एक्सप्रेसचं भाषांतर करतेवेळी मल्याळम लिपीत याचं भाषांतर इतकं चुकलं की अनेकांचाच संताप झाला. रेल्वे विभाग Google Translator च्या किती अधीन आहे पाहा... अशी उपरोधिक टीकाही यावेळी अनेकांनी केली.
Google Translat करत असताना हटिया रेल्वे स्थानकाचं नाव हत्या झालं आणि त्याचं इंग्रजीतील भाषांतर झालं Murder. थेट सांगायचं तर, मल्याळममध्ये 'हटिया'चं भाषांतर 'कोलापथकम' असं करण्यात आलं. याचा इंग्रजी अर्थ Murder होत होता.
सोशल मीडियावर ज्या क्षणी हा फोटो व्हायरल झाला तेव्हा नेटकऱ्यांना आणि त्याहून रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना विश्वासच बसेना. रेल्वे विभाग इतका हलगर्जीपणा कसा करु शकतो? हा प्रश्न अनेकांनीच उपस्थित केला. ज्यानंतर रेल्वेनंही ही चूक सुधारण्यासाठी काही पावलं उचलत झाला गोंधळ सावरून नेण्याचा प्रयत्न केला.