सूर्य, चंद्रानंतर इस्रोकडून 'या' ग्रहावर जाण्याची तयारी, 'अशी' असेल भविष्यातील योजना

ISRO Venus Mission:  भारत आता शुक्र ग्रहावर आपले मिशन पाठवण्याच्या तयारीत आहे आणि त्या दिशेने कामही सुरू झाले आहे. आगामी काळात हे ISRO द्वारे देखील लॉन्च केले जाईल असे सोमनाथ यांनी सांगितले आहे.

Pravin Dabholkar | Updated: Sep 27, 2023, 10:09 AM IST
सूर्य, चंद्रानंतर इस्रोकडून 'या' ग्रहावर जाण्याची तयारी, 'अशी' असेल भविष्यातील योजना  title=

ISRO Venus Mission: चंद्र आणि सुर्याच्या यशस्वी मोहिमेनंतर इस्रोच्या कार्याची जगभरात चर्चा सुरु आहे. सर्व देशांमधून इस्रोचे कौतुक होत आहे. आता इस्रो दिवसेंदिवस नवनवे शिखर गाठताना दिसत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रो) भारतीयांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. काय आहे ही बातमी? आता इस्रो कोणते नवे आव्हान पार करणार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग झाले. रोव्हर-लँडर आणि सूर्यन आदित्य एल1 च्या संशोधनातील प्रगतीनंतर इस्रोचा उत्साह वाढला आहे. रोज नवनवीन संशोधन करणाऱ्या इस्रोने आता दुसर्‍या ग्रहावर संशोधनाची योजना आखली आहे. इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. भारत आता शुक्र ग्रहावर आपले मिशन पाठवण्याच्या तयारीत आहे आणि त्या दिशेने कामही सुरू झाले आहे. आगामी काळात हे ISRO द्वारे देखील लॉन्च केले जाईल असे सोमनाथ यांनी सांगितले आहे.

भारताकडून इस्रोच्या माध्यमातून सूर्यमालेतील तेजस्वी ग्रह शुक्रावर जाण्यासाठी आपल्या मोहिमेची तयारी सुरु आहे. त्यासाठी अनेक पेलोड्सही तयार केले आहेत. आमच्या अनेक मोहिमा सैद्धांतिक टप्प्यात असल्याचे इस्रो प्रमुख म्हणाले. आता शुक्रासाठी मिशन तयार केले जात असून यासाठी पेलोड तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

शुक्राची मोहीम का महत्त्वाची?

शुक्रावरील संशोधनामुळे अवकाश विज्ञानाच्या जगातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात, असे सोमनाथ म्हणाले. शुक्राचे वातावरण अतिशय दाट आहे. तेथील वातावरणाचा दाब पृथ्वीच्या तुलनेत 100 पट जास्त आहे आणि तो आम्लाने भरलेला आहे. आपण त्याची पृष्ठभाग खोदू शकत नाही. त्याचा पृष्ठभाग घन आहे की नाही हे देखील आपल्याला माहित नाही. आपण हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत कारण पृथ्वीसुद्धा एक दिवस शुक्रासारखी होऊ शकते, असे ते म्हणाले. आजपासून 10 हजार वर्षांनंतर आपली पृथ्वी तिचे स्वरूप बदलेल कारण पूर्वी देखील पृथ्वी आजच्यासारखी नव्हती. पूर्वीचे जीवन इथेही शक्य नव्हते, असेही ते म्हणाले.

शुक्र हा सूर्यापासून पृथ्वीच्या दिशेने जाणारा दुसरा ग्रह असून तो पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. आतील वर्तुळातील चार ग्रहांपैकी एक असलेल्या शुक्राला अनेकदा पृथ्वीचे जुळे म्हटले जाते कारण तो आकार आणि घनतेने पृथ्वीसारखाच आहे. यापूर्वी, ईएसएच्या व्हीनस एक्स्प्रेसने 2006 ते 2016 दरम्यान शुक्राची परिक्रमा केली होती.

तर जपानचे अकात्सुकी व्हीनस क्लायमेट ऑर्बिटर 2016 पासून अजूनही शुक्रावर सक्रिय आहे. नासाच्या अनेक मोहिमा या ग्रहावर गेल्या आहेत. गेल्यावर्षी 9 फेब्रुवारी रोजी नासाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी प्रथमच शुक्राच्या पृष्ठभागाचे स्पष्ट चित्र टिपले आहे.