श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीच सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. दक्षिण काश्मीरमधी झालेल्या कारवाईत अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संलग्न असणाऱ्या गजवत- उल- हिंदचा म्होरक्या हमीद ललहारी याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश मिळालं आहे.
सुरक्षा दलासोबत झालेल्या कारवाईत एकूण तीन दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं, यामध्ये ललहारीचाही समावेश होता. जाकिर मूसाचा खात्मा झाल्यानंतर ललहारीला गजवत-उल-हिंदच्या प्रमुखपदी नेमण्यात आलं होतं.
ठार करण्यात आलेल्या या दहशतवाद्यांकडून एके४७ ताब्यात घेण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच गजवत-उल-हिंदचा कमांडर म्हणून ललहारीला नेमण्यात आलं होतं. तो मुळचा पुलवामा येथील रहिवाली होता. सध्याच्या घडीला अल कायदा ही दहशतवादी संघटना काही कटकारस्थानं रचत त्यांच्या दहशतवादी कारवाया आणखी वाढवण्याच्या विचारात असल्याची माहिती गुप्तहेरांकडून मिळाली आहे.
Kashmir Zone Police: 3 terrorists killed in #Awantipora encounter yesterday have been identified as Naveed Tak, Hamid Lone aka Hamid Lelhari and Junaid Bhat. Arms & ammunition recovered; Case registered.
— ANI (@ANI) October 23, 2019
कोण होता ललहारीच्या आधीचा गजवत- उल- हिंदचा म्होरक्या जाकिर मूसा?
२०१७ पासून जाकीर मूसा हा काश्मीर अल कायदाचा म्होरक्या होता. त्यापूर्वी तो हिज्बुल मुजाहिद्दीनचाही भाग होता. २०१७ मध्ये हुर्रियत परिषदेतील नेतेमंडळींना धमकावत 'आपण स्वातंत्र्याची नव्हे, तर इस्लामची लढाई लढत आहोत. इस्लामखातर स्वातंत्र्यासाठी आम्ही लढत आहोत. आमचं रक्त हे फक्त इस्लामसाठीच आहे...', असं म्हणाला होता. मे महिन्यात दक्षिण काश्मीरमधील त्राल येथे असणाऱ्या एका गावात झालेल्या चकमकीत जाकिर मूसाला ठार करण्यात आल्याचं म्हटलं जातं.