Jammu Kashmir Terrorist Attack : गेल्या काही काळापासून ज्या जम्मू काश्मीरमध्ये शांततापूर्ण वातावरण पाहायला मिळत होतं त्याच जम्मू काश्मीरमध्ये आता पुन्हा एकदा अशांततेचं वादळ आलं आहे. इथं पुन्हा एकदा सैन्य आणि दहशतवादी, कट्टरतावादी संघटनांमध्ये संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळत आहे. या भागात असणाऱ्या अनंतनागमध्ये मंगळवारी एक दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती स्थानिक पोलीस यंत्रणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.
दहशतवाद्यांनी केलेल्या या गोळीबारात दोन स्थलांतरित मजुर जखमी झाले असून, त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, दहशतवादी हल्ल्यानंतर सदरील भागात लष्कर आणि पोलिसांनी शोधमोहिम राबवली. यंदाच्या वर्षी अल्पसंख्यांक आणि स्थलांतरितांवर झालेला हा चौथा हल्ला असल्याची माहिती समोर आली.
#Terrorists fired upon two outside labourers in #Anantnag. Both the injured #civilians have been shifted to hospital, where they are stated to be stable. Area being cordoned off for search #operation. Further details shall follow.@JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) July 18, 2023
13 जुलै रोजी काश्मिरच्या दक्षिण भागात असणाऱ्या शोपियां जिल्ह्यात असणाऱ्या गगरान गावात तीन स्थलांरित मजुरांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यापूर्वी 26 फेब्रुवारीला पुलवामा येथील अचेनमध्ये एका बँकेच्या सुरक्षा रक्षकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. तर, 29 मे रोजी अनंतनागमध्ये अशीच गोळीबाराची घटना घडली होती.
दहशतवाद्यांच्या या कुरापती पाहता सध्या लष्करही सतर्क झालं असून, या कारवाया रोखण्यासाठी 'ऑपरेशन त्रिनेत्र' ही मोहिम हाती घेतली. पुंछच्या मेंढर भागात 20 एप्रिलपासून संरक्षणार्थ तैनात असणाऱ्या तुकडीवरील दहशतवादी हल्ल्यानंतर ही मोहिम हाती घेण्यात आली. यादरम्यानच मंगलवारी जम्मू काश्मीरच्या पुंछ येथे लष्कराकडून करण्या आलेल्या काराईमध्ये सीमेपलीकडून आलेल्या चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
संबंधित कारवाईमध्ये सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटतं असल्याचं स्पष्ट केलं. यामध्ये चीनी बनावटीच्या चार एके असॉल्ट रायफल आणि दोन पाकिस्तानी चिन्ह असणाऱ्या रायफलचा समावेश आहे.
दरम्यान, सध्याच्या घडीला सुरु असणाऱ्या अमरनाथ यात्रेवरही दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्यामुळं सध्या यंत्रणा इथंही करडी नजर ठेवून असल्याचं पाहायला मिळत आहे. यात्रा मार्गावर लष्कराचे जवान तैना असून, कडेकोट बंदोबस्तामध्ये ही यात्रा पार पडत आहे. यात्रेच्या आरंभापासून शेवटच्याटप्प्यापर्यंत यात्रेकरुंच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी लष्करानं घेतल्याचं पाहायला मिळत आहे.