Kargil Vijay Diwas : Indian Army ला पाकिस्तानी घुसखोरीची सर्वात पहिली माहिती देणारी व्यक्ती पाहिलीये?

त्या व्यक्तीच्या सतर्कतेमुळं मोठं संकट टळलं.... 

Updated: Jul 26, 2022, 01:19 PM IST
Kargil Vijay Diwas : Indian Army ला पाकिस्तानी घुसखोरीची सर्वात पहिली माहिती देणारी व्यक्ती पाहिलीये?  title=
Kargil Vijay Diwas

मुंबई : जवळपास 23 वर्षांपूर्वी भारतीय सैन्यानं मोठी कारवाई करत परकीय घुसखोरीला उळधून लावलं होतं. तत्त्कालीन पाकिस्तान सरकार आणि सैन्याच्या मदतीनं शेजारी राष्ट्रानं खुरापती करत कारगिल प्रांतात घुसखोरी केली होती. त्याचं उत्तर देताना भारतीय सैन्य आणि सेवेत असणाऱ्या जवानांनी अद्वितीय शौर्य दाखवत इतिहास रचला. (Kargil Vijay Diwas)

प्रत्येक भारतीय कारगिल युद्धात सहभागी झालेल्या, देशासाठी प्राण गमावलेल्या जवानांचा ऋणी आहे. तुम्हाला माहितीये का? ज्याप्रमाणे या भारतीय सैन्यानं या युद्धात मोठी कामगिरी बजावली, त्याचप्रमाणं एक असा सर्वसामान्य चेहराही होता, ज्यानं सर्वप्रथम देशातील या भागात घुसखोरी होत असल्याचं पाहिलं होतं. 

तो कुणी जवान किंवा सैन्याचा अधिकारी नव्हे, तर एक सर्वसामान्य गुराखी होता. योगायोगानं आपल्या प्राण्यांना चरण्यासाठी आणलं असता तो नव्या याकच्या शोधात तिथं आला होता. 

तिथं त्याच्या नजरेस काही माणसं पडली. ज्यांना पाहताक्षणीच त्याचे डोळे चमकले. ते भारतीय नाहीत, ही शंकेची पाल त्यांच्या मनात चुकचुकली आणि ही माहिती देण्यासाठी त्यांनी सैन्याच्या तळाकडे धाव घेतली. 

1999 मध्ये बाल्टिक सेक्टरमध्ये ही घटना घडली होती. या व्यक्तीचं नाव, ताशी नामग्याल. आज त्यांचं वय 58 वर्षे असल्याचं सांगण्यात येतं. ताशी यांच्या सांगण्यानुसार त्यावेळी तो याक नसता तर ते त्याला शोधण्यासाठी तिथं गेलेच नसते. 

23 वर्षांपूर्वी त्यांनी हा याक 12 हजार रुपयांना खरेदी केला होता. कोणत्याही किमतीत ते त्याला शोधू पाहत होते. याकला शोधत असतानाच त्यांना तिथं संशयास्पद हालचाली आणि सशस्त्र माणसं दिसली. ही माणसं दहशतवादी असल्याचा संशय त्यांच्या मनात आला. सोबतच त्यांना तिथे काही सैन्याची माणसंही दिसली. ज्यानी पाकिस्तानी सैन्याचा पोषाख घातला होता. ही सर्व माहिती त्यांनी लगेचच भारतीय सैन्यापर्यंत पोहोचवली. 

ताशी नामग्याल यांचं गाव कारगिलपासून जवळपास 60 किमी अंतरावर सिंधू नदीकिनारी वसलं आहे. गारकौन असं त्यांच्या गावाचं नाव. त्यांनी सैन्यापर्यंत पोहोचवलेल्या माहितीनंतर भारतीय सैन्य अधिक सतर्क झालं आणि सदर भागात गेल्या काही काळापासून पाकिस्तानकडून कारवाया सुरु असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली होती. 

Meet forgotten Kargil hero Tashi Namgyal - the local shepherd who saw Pak getting ready

पाकिस्तानी सैन्याकडून या भागात काही तळ तयार करण्यात आले होते. हे लक्षात येताच परिस्थिती चिघळली आणि कारगिल युद्धाची सुरुवात झाली. भारतीय सैन्यातून जवळपास 600 सैनिकांनी या युद्धात प्राण गमावले होते.