Kotak Bank Share Price: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. RBIच्या या कारवाईनंतर गुरवारी सकाळीच शेअर बाजार उघडताच कोटक महिंद्राच्या शेअर्सवर परिणाम झाला आहे. मार्केट सुरु होताच बँकेचे शेअर 10 टक्क्यांनी कोसळले आहेत. आरबीआयच्या कारवाईनंतर एकाच दिवसांत शेअरमध्ये पडझड झाल्याचे दिसून आले आहे. तज्ज्ञाच्या मते, आरबीआयच्या या कारवाईनंतर कोटक बँकेचा किरकोळ व्यवसाय आणि शेअर्सच्या किमतींबाबत मार्केटमधील विश्वासाला तडा जाऊ शकतो.
आरबीआयकडून करण्यात आलेली कारवाई ही कोटक बँकेसाठी खूप मोठा धक्का आहे. कारण ग्राहकांना जोडण्यासाठी बँके पूर्णपणे ऑनलाइन माध्यमांवर अवलंबून असतात. बँकेच्या 811 डिजीटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सेव्हिंग अकाउंट ओपन केले जातात. त्याचबरोबर बिनागँरटीवाले कर्जदेखील डिजीटल पद्धतीनेच दिले जातात. गेल्या एक वर्षात बँकेच्या डिजीटल व्यवसायात 40 टक्क्यांपर्यंत वृद्धी झाली आहे. जवळपास 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता आरबीआयच्या कारवाईनंतर कोटक बँकेची ग्रोथ, नफा आणि फीमध्ये होणाऱ्या कमाईवर परिणाम होणार आहे.
रिझर्व्ह बँकेकडून कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई करण्यात आल्यानंतर बँकेच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाल्याचे पाहायला मिळतेय. पहिल्याच दिवशी बुधवारी शेअर 1843 रुपयांवर बंद झाला. तर, गुरुवारी सकाळी 1675 रुपयांवर शेअर ओपन झाला. व्यवहाराच्या दरम्यान 1689 रुपयाच्या हाय लेव्हलपर्यंत गेला. इंट्रा डेटामध्ये शेअरचा लो लेव्हल 1620 रुपये इतकं होता. या दरम्यान हा शेअर 52 आठवड्याच्या सर्वात निच्चांकी 1620 रुपयांपर्यंत कोसळला आहे.
काही काळापूर्वी एचडीएफसी बँकेच्या बाबतीत जे घडले होते तेच कोटक महिंद्रा बँकेच्या बाबतीतही घडले आहे. रिझर्व्ह बँकेने 2020 मध्ये एचडीएफसी बँकेवरही अशीच कारवाई केली होती. त्यावेळी या समस्या सोडवण्यासाठी बँकेला 9 ते 15 महिने लागले होते. पण जर कोटक महिंद्रा बँकेनेही समस्या सोडवण्यासाठी अधिक वेळ घेतला तर त्याचा परिणाम बँकेच्या कमाई आणि खर्चावर होऊ शकतो, असे जेफरीज नावाच्या ब्रोकरेज फर्मने सांगितलं आहे.
बँकिंग रेग्युलेटर आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई करत ऑनलाइन किंवा मोबईल बँकिगच्या माध्यमातून नवीन ग्राहक जोडण्यास व क्रेडिट कार्ड जारी करण्यावर निर्बंध लादले आहेत. रिझर्व्ह बँकेकडून ही कारवाई केल्यानंतर कोटक बँक नवीन क्रेडिट कार्ड जारी करु शकत नाही. मात्र, आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, कोटक महिंद्रा बँक सध्या असलेल्या ग्राहकांकडून आणि क्रेडिट कार्ड होल्डरना आधीसारखीच सेवा देता येऊ शकते.