पूजा मक्कड, झी मीडिया, नवी दिल्ली : नीरव मोदीनं केलेल्या 12 हजार कोटींच्या अपहारामुळं पंजाब नॅशनल बँक सध्या अडचणीत आलीय... याच बँकेकडून माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनीही मोटार खरेदीसाठी कर्ज काढलं होतं... त्यानंतर वर्षभरातच त्यांचं निधन झालं... त्या कर्जाचं पुढं काय झालं?
लालबहादूर शास्त्री यांची कार... ही केवळ कार नाही... ते आहे प्रामाणिकपणाचं प्रतिक... देशातल्या प्रत्येकानं पाहायलाच हवं असं प्रतिक... डीएलई 6 क्रमाकांची ही कार म्हणजे जणू साधेपणा आणि सच्चाईचं एक स्मारकच...
जेव्हा नीरव मोदीसारखा हिरे व्यापारी भ्रष्टाचार करून पंजाब नॅशनल बँक बुडवायला निघालाय, त्यावेळी लालबहादूर शास्त्रींची आठवण येणं स्वाभाविक आहे. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी ही कार विकत घेतली होती. या गाडीचा इतिहास खरं तर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सांगितला गेला पाहिजे.
शास्त्रीजी पंतप्रधान झाल्यावरही त्यांची मुलं टांग्यानं शाळेत जायची. याउलट त्यांच्या हाताखाली काम करणा-या सचिवांची मुलं मात्र मोटारीनं शाळेत यायची... आपल्या मुलांच्या प्रेमळ हट्टाखातर त्यांनी गाडी घ्यायचं ठरवलं... पीएनबीकडून 5 हजार रूपयांचं कर्ज घेऊन त्यांनी ही कार विकत घेतली.
1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झालं. देशावरील संकटाचा शास्त्रींनी हिंमतीनं मुकाबला केला...1966 मध्ये ताश्कंदमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात समझोता झाला. ताश्कंदमध्येच लालबहादूर शास्त्रींचं निधन झालं. त्यानंतर कारचं कर्ज चुकवायची जबाबदारी त्यांची पत्नी ललिता शास्त्रींवर आली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी पीएनबीचं हे 5 हजार रूपयांचं कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव पुढं केला. पण ललिता शास्त्रींनी स्वतःच्या पेन्शनमधून कर्जाची परतफेड केली, अशी आठवण शास्त्रीजींचे पुत्र अनिल शास्त्री यांनी व्यक्त केली.
पंजाब नॅशनल बँकेचा इतिहास फार जुना आहे. इंग्रजांच्या राजवटीत 'क्रांतीकारकांची बँक' म्हणून ती ओळखली जायची... कदाचित म्हणूनच शास्त्रीजींनीही कर्ज घेण्यासाठी हीच बँक निवडली असावी. मात्र, दुर्दैवानं आज पीएनबी आर्थिक गैरव्यवहारांमुळं बदनाम झालीय.
लालबहादूर शास्त्रींच्या इमानदारीचं प्रतीक असलेल्या या मोटारीचं छायाचित्र खरं तर सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये लावण्याची गरज आहे. कदाचित ही कार पाहून लोकांना भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्याची प्रेरणा मिळेल...