Rahul Gandhi Lok Sabha Membership Restored: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्यानंतर आज त्यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. यासंदर्भातील नोटीफिकेशन आज मुख्य सचिव उत्पल कुमार सिंह यांनी जारी केलं आहे. सूरतमधील सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी काढून घेण्यात आली होती. मात्र शुक्रवारी म्हणजेच (4 ऑगस्ट 2023 रोजी) सुप्रीम कोर्टाने या शिक्षेला स्थगिती दिल्याने त्यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. यामुळे आता राहुल गांधींचा पावसाळी अधिवेशनामध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी खासदारांना मिठाई भरवून आनंद साजरा केला.
सुप्रीम कोर्टाने मोदी अडनाव प्रकरणामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या याचिकेवर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले होते. कनिष्ठ कोर्टाने एवढी शिक्षा देण्याचं कारण काय? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला. कमी शिक्षा दिली असती तर त्या मतदारसंघातील जनतेचे अधिकार अबाधित राहिले असते, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिली. या निर्णयामुळे राहुल गांधींचा खासदारकी पुन्हा मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला. पावसाळी अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाकडून खासदारकी पुन्हा बहाल करण्यात येत असल्याचं पत्र आवश्यक होतं. शुक्रवारी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर शनिवारी आणि रविवारच्या सुट्टीनंतर आज सोमवारी लगेच हे नोटीफिकेशन जारी करत राहुल यांना खासदारकी बहाल केली.
Lok Sabha Secretariat restores membership of Wayanad MP Rahul Gandhi after the Supreme Court on Friday (August 4) stayed his conviction in the ‘Modi’ surname remark case.
He was disqualified from the lower house in March 2023. pic.twitter.com/UBE3FvCGEN
— ANI (@ANI) August 7, 2023
सूरतमधील सत्र न्यायालयाने 23 मार्च रोजी राहुल गांधींना गुन्हेगारी प्रकरणामध्ये मानहानीच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती. राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. राहुल गांधींनी गुजरात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळून लावल्यानंतर प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं. 2 वर्षांची शिक्षा झाल्याने राहुल गांधींविरोधात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द केली होती. आता ही खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. 10 जनपथ य़ेथे ढोल वाजवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल यांना खासदारकी परत मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
#WATCH | Celebrations underway outside 10 Janpath in Delhi as Lok Sabha Secretariat restores Lok Sabha membership of party leader Rahul Gandhi pic.twitter.com/piqBayhKWS
— ANI (@ANI) August 7, 2023
राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या कोलार येथे 13 एप्रिल 2019 ला एका प्रचारसभेत म्हटलं होतं की "नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचं आडनाव सारखंच का आहे? सर्व चोरांचं आडनाव मोदी का असतं?". राहुल गांधींच्या या विधानाविरोधात भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरोधात कलम 499, 500 अंतर्गत मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. राहुल गांधी यांनी संपूर्ण मोदी चोर म्हणत संपूर्ण समाजाचा अपमान केला असल्याचं त्यांना तक्रारीत म्हटलं होतं.