नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींचे सगळे चौकीदार चोर आहेत असा टोला लगावत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला. यावेळी यांचा रोख कर्नाटकचे तात्कालीन मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्यावर होता. येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्री असताना भाजपाच्या नेत्यांना 1800 कोटी रुपयांची लाच दिली. याची लोकपाल अंतर्गत चौकशी व्हायला हवी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. भाजपाचे सारे चौकीदार चोर असल्याचे राहुल यांनी आपल्या ट्वीटरवर लिहीले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे नाव लिहिले आहे. पंतप्रधानांनी याचे तात्काळ उत्तर द्यायला हवे असे सांगत यावेळी त्यांनी मोदींवरही निशाणा साधला.
दुसरीकडे भाजपाने राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. दिवसभर वाट पाहुनही राहुल गांधी पत्रकार परिषद घ्यायला आले नाहीत. कारण त्यांच्या आरोपात दम नाही हे त्यांनाही माहित होते असे भाजपातर्फे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचा हा आरोप पाहता 'डोंगर पोखरून उंदीर काढणे' ही म्हण आठवल्याचेही रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले.
येदियुरप्पा आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ काँग्रेसने जारी केला होता. या संभाषणात येदियुरप्पा स्पष्टपणे लाच देण्याबद्दल बोलत असल्याचा आरोप यावेळी रणदीप सुरजेवाला केला होता. मुख्यमंत्री असताना येदियुरप्पा यांनी 2690 कोटी रुपये वसूल केले आणि यामधील 1800 कोटी रुपये भाजपा नेतृत्वाला पोहोचवले असा आरोपही यावेळी सुरजेवाला यांनी केला होता. येदियुरप्पा यांच्या डायरीचा दाखला यावेळी त्यांनी दिला होता.
येदियुरप्पा यांचा आधार घेऊन भाजपाने शीर्ष नेतृत्वाला पैसे दिले हे खरे नाही का ? असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला आहे. जर आयकर विभागाने त्या डायरीची चौकशी केली मग पुढे पाऊल का पडले नाही. पंतप्रधानांसहित संपूर्ण भाजपाच्या नेत्यांची याप्रकरणी चौकशी केली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. काँग्रेस याप्रकरणी कायदेशीर पाऊल उचलेल असे सुरजेवाला यांनी सांगितले. पण याप्रकरणी देशाच्या 'स्वयंभू चौकीदाराला' उत्तर द्यायला हवे असेही ते म्हणाले.