निवडणूक आयोगाची ड्युटी बजावण्यासाठी कर्मचारी 'स्वर्गातून' येणार?

सर्वात मोठा लोकशाही असलेल्या भारतात निवडणूक आयोगाचं काम अत्यंत संवेदनशील मानलं जातं

Updated: Mar 29, 2019, 12:33 PM IST
निवडणूक आयोगाची ड्युटी बजावण्यासाठी कर्मचारी 'स्वर्गातून' येणार? title=

जयपूर : लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक आयोगाचा हलगर्जीपणा समोर आलाय. यंदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून सेवानिवृत्त झालेल्या तसंच बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आलीय इतकंच नाही तर ज्यांचा मृत्यू झालाय अशा कर्मचाऱ्यांचीही या यादीत ड्युटी लावण्यात आलीय. 

नुकतंच, निवडणूक अधिकाऱ्यांच्या नावानं जारी करण्यात आलेल्या आदेशांत सेवानिवृत्त आणि मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांनाही ४ एप्रिल रोजी निवडणूक प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आलंय. याबद्दल जिल्हा निवडणूक अधिकारी जगरूप सिंह यादव यांना याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. आपल्याकडे अशी कोणतीही माहिती नाही, कारण आपल्याकडे अद्याप कुणी तक्रार केलेली नसल्याचं म्हटलंय. सर्वात मोठा लोकशाही असलेल्या भारतात निवडणूक आयोगाचं काम अत्यंत संवेदनशील मानलं जातं. 

सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना या यादीत पीओ २ आणि पीओ ३ बनवण्यात आलंय. जिल्हा निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या कागदपत्रांनुसार, २९ डिसेंबर २०१५ रोजी मृत्यू झालेल्या डीआयपीआर वरिष्ठ सहाय्यक श्यामलाल यांची ड्युटी पीओ २ वर लावण्यात आलीय. त्याचप्रमाणे कनिष्ठ सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या सुनील कुमार यांचा १४ नोव्हेंबर २०१७ रोजी तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी रामकरण मीना यांचा ३ मे २०१३ रोजी मृत्यू झालाय. परंतु, मृत्यूनंतरही त्यांच्या नावांचा या यादीत समावेश आहे. 


निवडणूक आयोगाची यादी 

या यादीत पाच ते दहा वर्ष जुन्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या नावांचा समावेश या यादीत आहे. जयपूर हा सर्वात मोठा जिल्हा असून इथं निवडणुकीसाठी ५० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना ड्युटीवर तैनात करण्यात येतं. या यादीतील डाटा अपडेट करण्याची जबाबारी विभाग अध्यक्षांची आहे... जिल्हा आयोगाची यात चूक नाही. शिवाय अद्यापही या यादीबद्दल कुणीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे या घोळासाठी जबाबदार असलेल्या विभाग अध्यक्षांवर आरपी ऍक्टनुसार कारवाई करण्यात येईल, असं जिल्हा निवडणूक अधिकारी जगरूप सिंह यादव यांनी म्हटलंय. 

उल्लेखनीय म्हणजे जयपूर जिल्ह्यात निवडणूक आयोगाबद्दल अशी तक्रार काही नवीन नाही. याआधीही अनेकदा कर्मचाऱ्यांच्या ड्युटीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही आयएएस अधिकाऱ्यांच्या ड्युट्यांचा घोळ समोर आला होता.