Bacchu Kadu on Navneet Rana:अमरावती लोकसभा मतदार संघातून भाजपकडून नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाली. असे असले तरी महायुतीमध्ये असलेल्या अनेक नेत्यांना हा निर्णय पटलेला दिसत नाही. त्यांनी सुरुवातीपासूनच नवनीत राणांच्या नावाला विरोध केला. आता प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर टीका केली.
काल आमची नांदेडला एक बैठक झाली आणि जालना, अहमदनगर, बीड या जिल्ह्यातील प्रमुखांची बैठक संभाजीनगरला झाली. लोकसभेबाबत आपण काय केले पाहिजे आणि कशा पद्धतीने समोर गेलं पाहिजे यासाठी ही बैठक झाल्याचे बच्चू कडुंनी सांगितले. आम्हाला भरपूर त्रास झालाय असे कार्यकर्त्यांनी सांगितले. जालन्याच्या खासदारांना प्रचंड त्रास दिला. काहीजण सांगतात की निलेश लंके चांगले आहेत. असे काही काही कार्यकर्ते आम्हाला सांगायला लागलेले आहेत. तर या सगळ्याटा विचार करुन एका निर्णयापर्यंत आपल्याला जावं लागणार असल्यास बच्चू कडू यांनी म्हटले आहे. त्यासाठी ही प्राथमिक बैठक आम्ही आयोजित केलेली आहे. चार जिल्ह्यांची ही बैठक होती. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते त्याचा मेळावा घेऊन त्या निर्णयापर्यंत आपण जाऊ. आता अमरावतीचं काही राहिलेलं नाही. पोस्टमार्टम झालेलं आहे. फक्त निकाल बाकी आहे आणि तो म्हणजे प्रहारचाच आहे, असे ते म्हणाले.
महायुतीतील आमची लढत ही मैत्री पूर्ण आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये तरी आता पुढचा निर्णय युतीने घ्यावा. आमची आणि त्यांची लढत त्यांच्या विरोधात नाही. आम्ही युतीतून बाहेर जावं की राहावं? तो निर्णय सध्या महायुतीकडे आहे. त्यांनी जो निर्णय घेतला त्याचे आम्ही स्वागत करु, असे ते म्हणाले.
नवनीत राणा यांच्या बद्दलचा 100 पानाचा हायकोर्टाचा निकाल आहे.. सगळी बनवाबनवी झालेली आहे, असे त्यात नमूद आहे. त्यांच्याविरोधात देशद्रोहापर्यंतचे गुन्हे दाखल आहेत. असे असताना अडीच वर्षे सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही. मग कोर्टात केस पेंडिंग असतानादेखील येथे उमेदवारी दिली जाते. या तानाशाहीच्या विरोधात आमची खरी लढाई असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. रवी राणांची वागणूक अतिशय राग आणि संताप येणारी आहे. म्हणून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असते. मी स्वतःचा अपमान सहन करेल पण पण कार्यकर्ते म्हणतात की या अपमानात आपण युतीच्या बाहेर निघाला तर बरं. आमचा प्रहार पक्ष कायम राहिला पाहिजे म्हणून आम्ही अमरावतीमधून उमेदवारी टाकल्याचे ते म्हणाले.
मुंबईच्या दौऱ्यानंतर जरांगे पाटील आणि माझा संबंध नाही. त्यानंतर त्यांच्यासोबत बोलणं झालं नाही. मी त्यांच्यासोबत गेलो होतो त्यावेळेस राजकीय विचार नव्हता तर सामाजिक विचार होता. त्यांनी निवडणुका आमच्या सोबत लढवावी यासाठी मी त्यांना फोन करणार नाही, कारण आमचा तो स्वभाव नाही. आता ब्रह्मदेव खाली आला तरी आम्ही निवडणूक लढणारच. विचाराचा झेंडा समाधीनंतर सुद्धा जिवंत राहतो तो आम्ही कायम ठेवणार, असे ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी मी कोणती प्रतिक्रिया देण्यासाठी इच्छुक नाही मी फक्त त्यांनी उपोषण सोडलं पाहिजे म्हणून प्रयत्न केले तेवढा माझा हस्तक्षेप होता त्यापेक्षा जास्त नाही.
आमच्या जिथे ग्रामपंचायत आहे तिथे निधी दिला जात नाहीत. जो दिला आहे तो काढून घेतला जातो. म्हणून आम्हाला आमचे निर्णय घ्यावे लागतील. आमचा पक्ष दिल्लीत आणि मुंबईत चालत नाही. गावा खेड्यात चालतो. आम्हाला दिल्ली मुंबईची वारी करायची गरज नाही. जालन्यात काँग्रेसला मदत करावी असं कार्यकर्त्यांचे मत आहे मात्र अजून निर्णय नाही पूर्ण बैठका झाल्यावर निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.
जर तर वर विश्वास ठेवून चालणार नाही. आम्ही अमरावतीची जागा लढू असं म्हटलं नव्हतं पण मोठ्या पक्षाने चुका केल्या त्यामुळे लढावं लागतंय. महायुतीतून बाहेर पडण्याची माझी इच्छा नाही त्यांची तशी इच्छा असेल तर आनंदाने ते स्वीकारू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. सागर बंगल्यावर आल्यानंतर बच्चू कडू शांत होतील असे विधान नितेश राणेंनी केले होतेय. यावरुन बच्चू कडूंनी राणेंवर टीका केलीय. नितेश राणे काय सांगणार? ब्रह्मदेवापेक्षा कोणी मोठा आहे का? ते आले तरी आम्ही निवडणूक लढणारच असे बच्चू कडू म्हणाले. नितेश राणे अजून खूप छोटा आहे. त्याला अजून बरीच समज यायची असल्याचे ते म्हणाले.