Arunachal Renaming Row: चीनने अरुणाचल प्रदेशमधील काही भागांचं नामांतरण केल्याचा दावा भारताने फेटाळून लावला आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असं भारताने चीनच्या या कथित कुरघोड्यांवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अऱिंदम बागची यांनी अशाप्रकारे मनाला येईल ती नावं ठेवल्याने सत्य बदलणार नाही, असा टोला चीनला लगावला आहे. बागची यांनी, "आम्ही अशा बातम्या यापूर्वीही पाहिल्या आहेत. चीनने असे प्रयत्न या आधीही केले आहेत. आम्ही हे दावे पूर्णपणे फेटाळून लावत आहोत," असं सांगितलं. "अरुणाचल प्रदेश हा कायमच भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे. वाटेल ती नावं दिल्याने हे सत्य बदलणार नाही," असंही बागची म्हणाले.
चीनने अरुणालचवर आपला दावा सांगण्याचा पुन्हा एकदा प्रयतन केला आहे. या प्रदेशावर हक्क सांगण्यासाठी भारताच्या या राज्यातील जागांची नावं नव्याने ठेवण्यात आल्याची 'चीनी तिबेटी आणि पिनयिन' अक्षरांमधील नव्या नावांची तिसरी यादी जाहीर केली आहे. चीनमधील सार्वजनिक नागरी प्रकरणांच्या मंत्रालयाने रविवारी अरुणाचल प्रदेशमधील 11 ठिकाणांची नावं जारी केली आहे. चीनमधील स्टेट काउन्सिल म्हणजेच कॅबिनेट मार्फत जारी केल्या जाणाऱ्या भौगोलिक नावांनुसार या प्रांताला 'तिबेटच्या दक्षणेकडील जंगनान' भाग असं नाव देण्यात आलं आहे.
चिनी सरकारच्या 'ग्लोबल टाइम्स' या वृत्तपत्राने सोमवारी यासंदर्भातील वृत्त दिलं. यामध्ये मंत्रालयाने रविवारी 11 ठिकाणांची नावं बदलल्याची यादी जारी केल्याचा उल्लेख आहे. यामध्ये दोन नावं प्रांतांची आहेत. दोन प्रांत असे आहेत जे निर्मनुष्य आहेत. 5 पर्वत रांगा आणि 2 नद्यांची नावं बदलण्यात आली आहेत. तसेच या ठिकाणांचा समावेश जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. अशाप्रकारे चीनने जारी केलेली ही तिसरी यादी आहे. यापूर्वी त्यांनी 2017 मध्ये 15 ठिकाणांची नावं जारी केली होती. त्यानंतर दुसरी यादी 2021 मध्ये जारी करण्यात आली होती.
चीनने केलेल्या या उचापतींवर प्रतिक्रिया देताना भारताने हे नामांतरण मान्य नसल्याचं सांगितलं आहे. अरुणाचल प्रदेश हा कायमच भारताचा अविभाज्य भाग आहे. तसेच तो यापुढे भविष्यातही भारताचाच भाग राहणार आहे. अशाप्रकारे मनाची नावं दिल्याने सत्य बदलणार नाही. 2021 मध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अऱिंदम बागचींनी डिसेंबर 2021 मध्ये यावर प्रतिक्रिया नोंदवलेली. "हे असं पहिल्यांदाच झालेलं नाही. याआधीही चीनने अरुणाचलमधील नावं बदलण्याचा प्रयत्न केलेला. अरुणाच कायमच भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे आणि कायमच राहील. वाटेल ती नावं देण्यात आल्याने सत्य बदलणार नाही," असं बागची म्हणाले.