नवी दिल्ली: राम मंदिराच्या आश्वासनाबाबत पंतप्रधान नरेंद्र फसवणार नाहीत. ११ डिसेंबरनंतर राम मंदिराबाबत काहीतरी मोठा निर्णय घेतला जाईल, असा दावा स्वामी राम भद्राचार्य यांनी केला. ते रविवारी विहिंपने आयोजित केलेल्या धर्मसभेच्या व्यासपीठावरून बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारमधील एका मंत्र्याने नाव न सांगण्याच्या अटीवर मला ही माहिती दिली. राम मंदिराच्या मुद्यावर आमच्यात जवळपास १० मिनिटे चर्चा झाली. तेव्हा ११ डिसेंबरनंतर राम मंदिराबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकार ६ डिसेंबरलाच हा निर्णय घेणार होते. मात्र, आचारसंहितेमुळे त्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. मात्र आचारसंहितेमुळे त्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. ११ डिसेंबरनंतर काहीतरी ठोस निर्णय नक्कीच घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले.
विहिंपकडून धर्मसभेसाठी अयोध्येत मोठी मोर्चेबांधणी करण्यात आली होती. जवळपास दोन लाख रामभक्त या सभेला येतील, असा दावाही विहिंपने केला होता.
तत्पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानेही अयोध्येतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले. राम मंदिराचं निर्माण होणारच, पण या सरकारनं मंदिर बांधलं नाही तर भविष्यात हे सरकार बनणार नाही, असा थेट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारला दिला.