नवी दिल्ली : देशात भाजप आणि संघ दुही निर्माण करण्याचे काम करत आहेत. गरीब आणि श्रीमंत असा भेद करत आहेत. सुटाबटातील लोकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ आहे. मात्र, गरीब आणि शेतकऱ्यांसाठी त्यांना वेळ नाही. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नाहीत. मात्र, काही बड्या उद्योगपतींची कर्ज माफ करण्यात येत आहे. जिओच्या पोस्टरवर मोदी कसे काय? मोदी हे चौकीदार नाही तर भागीदार आहेत, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज मोदी यांच्यावर लोकसभेत चढवला.
पीडीपी आणि काँग्रेससह विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. यासंबंधीची चर्चा लोकसभेत सुरू असताना लक्षवेधी ठरले ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे भाषण. आपल्या भाषणात त्यांनी मोदी सरकारने न केलेल्या कामांचा पाढाच वाचला. तरुणांना रोजगार, नोकरी देण्याचे आश्वासन दिले, मात्र गेल्या चार वर्षात किती जणांना नोकऱ्या, रोजगार मिळाला, असा सवाल राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.
तुम्ही मला पप्पू म्हणा किंवा अन्य शिव्या द्या, पण माझ्या मनात तुमच्याबद्दल राग नाही, द्वेष नाही. मी काँग्रेस आहे. काँग्रेस ही एक भावना आहे आणि मी तुम्हालाही काँग्रेस करेन, असं म्हणत राहुल यांनी भाषणाचा समारोप केला. त्यानंतर ते थेट मोदींजवळ गेले आणि त्यांनी मोदींची गळाभेट घेतली. हे सगळं भावनेच्या भरात होतंय, असंच सगळ्यांना वाटलं. पण, आपल्या जागेवर बसताना राहुल यांनी शेजारच्या सहकाऱ्यांकडे बघून डोळा मारला. त्यानंतर गळाभेटी ऐवजी त्यांच्या डोळ्याची चर्चा सुरु झालेय.