Car Full Of Sarees BJP vs Congress: मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. याचसंदर्भातील प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले पक्ष सोडताना दिसत नाहीत. असं असतानाच खंडवा जिल्ह्यामधील मांधाता मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना साड्यांनी भरलेली एक कार पकडली आहे.
साड्यांनी भरलेली ही कार पुनासाला जात होती. काँग्रसने केलेल्या आरोपानुसार या कारमधून भारतीय जनता पार्टीचे नेते पुनासा येथे जात होते. तसेच वॉर्डमधील महिलांना या साड्यांचं वाटप केलं जाणार होतं. या साड्या नेसून आमच्या कार्यक्रमाला हजर राहा असं भाजपाकडून सांगण्यात येत होतं, असा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने आम्ही सक्रीय राहिल्याने भाजपाचा हा डाव आम्हाला हाणून पाडता आला असा दावाही केला आङे.
निवडणुकीची तारीख जवळ आल्यानंतर मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. खंडवा येथील पुनासामध्ये मात्र आचारसंहितेचा भंग झाल्याचं हे प्रकरण समोर आलं आहे. येथील मांधाता मतदारसंघामध्ये पुनासा येथे एका कारच्या डिकीमध्ये मोठ्याप्रमाणात पॅकिंग केलेल्या साड्या आढळून आल्या. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी पकडली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपानुसार भाजपाचे लोक नागरिकांनी त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित रहावं म्हणून महिलांना साड्यांचं वाटप करत आहे असा आरोप केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्या कारमध्ये मोठ्याप्रमाणात साड्या होत्या ती पुनासाचे भाजपा नगराध्यक्षांची असल्याचं सांगितलं जातं.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही कार पुनासा पोलीस चौकीमध्ये नेली आणि पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. एफएसटीचे अधिकारी महेशचंद वर्मा यांनी आम्हालाही डिकीमध्ये भरपूर साड्या असलेली एक कार पकडण्यात आल्याच्या माहिती मिळाली आहे असं सांगितलं. पोलिसांनी ही कार ताब्यात घेतील आहे. या कारमधून 129 साड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणाची माहिती मिळता मांधता विधानसभेचे काँग्रेस उमेदवार उत्तमपाल सिंह यांनी पुनासा पोलीस चौकीत धाव घेत प्रकरणाची माहिती घेतली. भाजपाचे लोक पैसे आणि साड्यांचं वाटप करुन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी सखोल तपास सुरु केला आहे.