JEE मेन्स मध्ये ओम प्रकाशला पैकीच्या पैकी मार्क; हे कसं शक्य झालं? त्यानंच केलं मार्गदर्शन

नुकताच, देशभरात झालेल्या जेईई मेन्स या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आणि या परीक्षेतील पहिल्या पेपरमध्ये ओम प्रकाश बेहेरेने 300 पैकी 300 गुण मिळवले. परीक्षेच्या यशासंदर्भात त्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना अभ्यासासंदर्भात सल्लादेखील दिला. 

Updated: Feb 13, 2025, 11:41 AM IST
JEE मेन्स मध्ये ओम प्रकाशला पैकीच्या पैकी मार्क; हे कसं शक्य झालं? त्यानंच केलं मार्गदर्शन  title=

JEE Mains Session 1 Topper: संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) ही भारतातील अभियांत्रिकी क्षेत्रातील एक उच्च स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा आहे. नुकताच, देशभरात झालेल्या जेईई मेन्स या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आणि या परीक्षेतील पहिल्या पेपरमध्ये ओम प्रकाश बेहेरेने 300 पैकी 300 गुण मिळवले. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने मंगळवारी संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE)-मेन 2025, सत्र 1 च्या पेपरचा निकाल जाहीर केला. 

या उच्च काठीण्य पातळी असणाऱ्या परीक्षेत 100 पर्सेंटाइल मिळवण्याबाबत ओम प्रकाशने विद्यार्थ्यांना सल्ला दिला. त्याचा हा सल्ला जेईई परीक्षार्थींना नक्की उपयुक्त ठरेल. ओम प्रकाशने विद्यार्थ्यांना आपल्या कमतरतेकडे अधिक लक्ष देत येणाऱ्या परीक्षांना सामोरे जाण्याचा सल्ला दिला.  

ओम प्रकाशचा सल्ला

ओम प्रकाशने सांगितले, "मला पैकीच्या पैकी गुण मिळवण्यामागे माझी तीन वर्षांची मेहनत आहे. या मेहनतीच्या परिणामांमुळे मी खूप आनंदी आहे. हे यश मिळवण्यासाठी माझ्या आई बाबांनीसुद्धा तितकेच कष्ट केले. त्यामुळे वाईट परिणामांचा अजिबात विचार न करता, आपल्या कमतरतेकडे लक्ष द्या आणि येणाऱ्या परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा."

सक्षम जिंदलनेही दिला सल्ला

तसेच, जेईई मेन्स मध्ये सक्षम जिंदल या विद्यार्थ्याने 300 पैकी 295 गुण मिळवले. सक्षमने सुद्धा आपल्या परीक्षेच्या तयारीबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी परीक्षेचा अभ्यास करताना एनसीईआरटी (NCERT) च्या अभ्यासक्रमाकडे लक्ष देणे आवश्याक असल्याचे त्याने सांगितले. NCERT मधून अधिक प्रश्न विचारण्यात येतात, त्यामुळे या अभ्याक्रमाकडे लक्ष दिल्याने परीक्षेसाठी नक्की फायदा होणार असल्याचे देखील त्याने सांगितले. यापुढे सक्षम म्हणाला, "मी मागील 2 वर्षांपासून 'जेईई ॲडव्हान्स्ड'ची तयारी करत आहे. गेल्या एक महिन्यापासून मी एनसीईआरटीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे, कारण जेईई मेन्समध्ये एनसीईआरटीमधून अनेक प्रश्न विचारले जातात. मी दररोज माझ्या पालकांशी माझ्या अभ्यासाबद्दल बोलतो. यामुळे मी प्रेरित आणि तणावमुक्त राहतो. मी माझ्या गुणांबाबत समाधानी आहे."

यावर्षी जेईई मेन्सचा पहिला पेपर जानेवारीत झाला होता. वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार या परीक्षेला एकूण 12,58,136 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. NTA नुसार, 14 जणांना पेपरमध्ये 100 गुण मिळाले आहेत. यामध्ये राजस्थानातील पाच विद्यार्थी, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी दोन विद्यार्थी तसेच कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रत्येकी एका विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.