Ganeshotsav 2025 : गणेशोत्सवाला 6 महिने शिल्लक असतानाच याच सण-उत्सवाशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय न्यायालयानं दिला आणि त्यानंतर आता मुंबईत महानगरपालिकेनंही महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आता बाप्पाच्या मूर्ती या शाडू मातीच्याच असणार हे स्पष्ट होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मुंबईत इथून पुढं प्लॅस्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपीच्या मूर्तींसाठी कठोर बंदी कायम राहणार असून, त्यासाठी पालिकेकडूनच मोफत आणि गरज असेल तितकी माती मूर्ती कलाकार आणि व्यावसायिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठीची नोंदणी प्रक्रिया जवळपास 6 महिने आधी म्हणजेच 1 मार्चपासून सुरू होणार आहे, अशी माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.
दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचं विघटन होत नसल्यामुळं विसर्जनानंतर मूर्तीची मोडतोड केली जाते. याच धर्तीवर सर्वोच्च न्यायालयानं उत्सवकाळात पीओपीच्या मूर्तींवर 100 टक्के बंदी घालण्याचा निर्णय घेत या आदेशाच्या कठोर अंमलबजावणीचे निर्देश मुंबई महानगरपालिकेसह पोलीस यंत्रणेला दिले.
सदर आदेशानंतर नुकत्याच झालेल्या माघी गणेशोत्सवातील 'पीओपी'च्या मूर्तींचंसुद्धा समुद्रात विसर्जन करण्यात आलं नाही. परिणामी कांदिवली, चारकोप येथील माघी गणेशोत्सवातील गणेशमूर्ती विसर्जन करण्यास बंदी घातल्याने गणेशभक्तांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला.
गणेशोत्सवादरम्यान शाडूच्या मूर्तींचं बंधन असलं तरीही मातीपासून तयार करम्यात आलेल्या मोठ्या मूर्तींना मजबुती मिळणार नसल्याचं मूर्तिकारांचं मत असून त्यामुळे मोठ्या मूर्तीसाठी पालिकेने योग्य पर्याय द्यावा असा सूर आळवला जात आहे.
गणेशमूर्तींच्या उंचीवरही लवकरच निर्णय
फक्त पीओपी मूर्तीच नव्हे, तर गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असून, अनेकदा मूर्तींच्या उंचीमुळंही त्या कृत्रिम तलावात विसर्जित करता येत नाहीत. त्यामुळं मूर्तीच्या उंचीसंदर्भातही निर्णय लवकरच घेतला जाईल असं सांगितलं जात आहे.