झी मीडिया, ब्युरो रिपोर्ट
Sanjay Dina Patil News: अलीकडेच शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सत्कार झाला. या सत्कारानंतर एकीकडे संजय राऊतांनी पवारांवर टीका केली होती. शरद पवारांनी सत्कार सोहळ्याला जायला नको होतं असं राऊत म्हणाले होते. दुसरीकडे मात्र शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांनीही या सोहळ्यात हजेरी लावली होती. संपूर्ण सोहळा संपेपर्यंत संजय दिना पाटील हे कार्यक्रमात हजर होते. विशेष म्हणजे सोहळ्यानंतर श्रीकांत शिंदेंकडून आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमालाही संजय दिना पाटील गेले होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
संजय दिना पाटील यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर सर्वांच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. संजय दिना पाटील यांनी एक ट्विटदेखील केलं आहे. महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार व मराठी जन सन्मान सोहळ्याप्रसंगी उपस्थित होतो. यावेळी पद्मविभूषण, राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, असं ट्विट त्यांनी केलं आहे. तसंच, या कार्यक्रमांचे फोटोदेखील त्यांनी शेअर केले आहेत.
संजय दिना पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेला जाणंही टाळलं होतं मात्र शिंदेंच्या सत्कार समारंभाच्या सोहळ्याला उपस्थित राहिल्याने राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी अरविंद सावंतसह सर्व खासदारांनी एक पत्रकार परिषद बोलवली होती. मात्र त्या पत्रकार परिषदेला संजय दिना पाटील उपस्थित नव्हते. मात्र या सोहळ्याला उपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दीड वाजता संजय दिना पाटील हे संजय राऊतांची भेट घेणार असून यासंदर्भात सविस्तर चर्चा करणार असण्याचे समोर येत आहे.
महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार व मराठी जन सन्मान सोहळ्याप्रसंगी उपस्थित होतो. यावेळी पद्मविभूषण, राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.… pic.twitter.com/NLDhDiOdmq
— Sanjay Dina Patil (@SDPatil_16) February 11, 2025
संजय दिना पाटील हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते याची माहिती त्यांनीच दिली आहे. ते काही चोरून लपून गेले नव्हते. त्यांनीच समाजमाध्यमांवर फोटो पोस्ट करुन माहिती दिली आहे. संजय दिना पाटील हे त्या कार्यक्रमाला का गेले याची उत्तरे ते पक्षप्रमुखाला देतीलच. कदाचित पवार साहेब त्या कार्यक्रमाला आहेत म्हणून गेले असतील. संजय दिना पाटील यांनी शरद पवारांसोबत काम केलं आहे. शिवसेनेत येण्यापूर्वी त्यांनी एकत्र काम केले आहे. शरद पवार त्या कार्यक्रमाला जाणार असल्यामुळं तेदेखील त्यांच्यासोबत गेले असतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना यूबीटीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.