Rs 140 Crore Case: मुंबईमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाखाली 140 कोटींची चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सेवा आणि वस्तू कर म्हणजेच जीएसटीसंदर्भातील ही चोरी असल्याचं समोर आलं आहे. मुंबईच्या क्षेत्रीय केंद्रीय जीएसटी विभागाने 140 कोटी रुपयांची जीएसटी करचोरी उघड केली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बनावट जीएसटी देयकांच्या आधारे 140 कोटी रुपयांची ही करचोरी होत होती. या प्रकरणी मीरा रोड येथून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचं नाव कपाडिया मोहम्मद सुल्तान असं आहे. विशेष म्हणजे 26 कोटी 92 लाखांच्या करचोरीचा तपास करताना हे एवढ्या मोठ्या प्रमाणातील आकडे आणि करचोरीचं प्रकरण उजेडात आलं आहे.
या प्रकरणी सुरुवातीला 26 कोटी 92 लाख रुपयांची चोरी समोर आली होती. त्यासंबंधी अधिक तपास केला असता मुख्य आरोपी सुल्तान हा 18 बनावट कंपन्यांच्या नावे देयके तयार करुन जीएसटीचा परतावा घेत असल्याचे दिसून आले. अशा बनावट परताव्यांचा आकडा 140 कोटी रुपये इतका होता.
नक्की वाचा >> आयकर विभागाने जप्त केलेलं 70 लाखांचं सोनं पुण्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या लॉकरमधून गायब; कोर्ट म्हणालं, 'गहाळ..'
हा एवढा मोठा घोटाळा करण्यासाठी सुल्तानने आधार कार्ड, पॅनकार्डसह अन्य दस्तावेजांचा गैरवापर केला होता. हे कार्ड विविध व्यक्तींच्या नावे होते. त्यांच्या नावे बनावट कंपन्या उघडून जीएसटीचा परतावा स्वतःच्या खात्यात घेतला जात होता.
नक्की वाचा >> 'भ्रष्ट देशांच्या यादीत भारताची नोंद ‘भ्रष्टशिरोमणी’ अशी होत असेल तर...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
सुल्तानला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायिक कोठडी सुनावली आहे. बनावट कागदपत्रांच्या मदतीने अशाप्रकारे करचोरी करणाऱ्यांविरोधात जीएसटी विभागाकडून अधिक तपास सुरू आहे. सध्या पोलीस सुल्तानची चौकशी करत असून यामध्ये त्याला इतर कोणी मदत केली याचा शोध घेतला जात आहे.