नवी दिल्ली: येस बँकेवर ओढावलेल्या आर्थिक अरिष्टाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली, असे ट्विट राहुल यांनी केले. अनुत्पादित कर्जाची समस्या हाताबाहेर गेल्यानंतर रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादत बँकेचा कारभार चालवण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती केली होती. या घटनेमुळे आर्थिक विश्वात मोठी खळबळ उडाली असून त्यामुळे बँकेच्या खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. गेल्या सहा वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. या काळात वित्तीय संस्थांवर नियंत्रण ठेवण्याची त्यांची क्षमता दिसून आली आहे. पीएमसी बँकेनंतर येस बँकेवर अशी वेळ ओढावली. सरकारला या सगळ्याची फिकीर आहे का? सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहे का? आता तिसरा क्रमांक कोणत्या बँकेचा, असा खोचक सवाल पी. चिदंबरम यांनी सरकारला विचारला होता.
No Yes Bank.
Modi and his ideas have destroyed India’s economy.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 6, 2020
मात्र, भाजपने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. भारतीय बँकिंग क्षेत्राची वाट लावण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या स्थितीला माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना जबाबदार धरले पाहिजे, असे भाजप नेते अमित मालवीय यांनी म्हटले.
दरम्यान, येस बँकेत एसबीआयने २ हजार ४५० कोटी रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता येस बँकेची ४९ टक्के मालकी एसबीआयकडे जाणार आहे. या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर सीईओ आणि तीन संचालक नेमले आहेत. तसंच गुंतवणूकदारांना आपले दोन प्रतिनिधी नेमता येणार आहेत. येस बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध आणले तरी खातेदारांचा पैसा सुरक्षित असल्याची ग्वाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. येस बँकेच्या ग्राहकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.