नवी दिल्ली : स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचं योगदान असणाऱ्या चले जाओ आंदोलनाला ७५ वर्षे पूर्ण झालीत. या निमित्ताने संसदेत एका विशेष चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी चले जाओ आंदोलनात सहभागी झालेल्यांना अभिवादन करण्यात आलं. देशातून भ्रष्टाचार, जातीयता अशा गोष्टी हद्दपार करण्यासाठी साऱ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.
२०२२ पर्यंत नवीन भारत निर्माणाचा संकल्प यावेळी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलाय. देशात महात्मा गांधींसारखं नेतृत्व नसलं तर सव्वाशे कोटी जनता त्यांच्या स्वप्नातला भारत घडवू शकते, असा आशावादही मोदींनी व्यक्त केला. राजकारणापेक्षा राष्ट्रनीती महत्त्वाची असल्याचंही मोदी म्हणालेत.
तर याच चर्चेदरम्यान काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. सध्या देशात द्वेष आणि सूडाचं राजकारण केलं जात असल्याने खुला संवाद तसंच चर्चेला स्थान नाही अशा शब्दांत सोनिया गांधींनी भाजपवर टीका केलीय.