नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधींनी निवडणूक प्रचारात केलेल्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे. पुढच्या ६ महिन्यात देशाचा तरुण नरेंद्र मोदींना दांड्याने मारेल, असं राहुल गांधी म्हणाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत बोलताना राहुल गांधींच्या या वक्तव्याचा समाचार घेतला.
'पुढच्या ६ महिन्यात देशाचा तरुण मला दांड्याने मारेल असं वक्तव्य, काँग्रेसच्या नेत्याने केलं. आता मला सूर्यनमस्काराची संख्या वाढवावी लागेल. सूर्यनमस्काराची संख्या वाढवून पाठ एवढी मजबूत करु की दांडे सहन करण्याची ताकद माझ्यात येईल. मागच्या २० वर्षांमध्ये मला एवढ्या शिव्या देण्यात आल्या, त्यामुळे मी गालीप्रुफ झालो आहे,' असं मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी हे बोलत असताना राहुल गांधी स्वत:च्या आसनावरुन उठले आणि काही तरी प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न केला. लोकसभेमध्ये गोंधळ सुरु असल्यामुळे राहुल गांधी नेमकं काय म्हणाले ते कळू शकलं नाही. पण राहुल गांधी उभे राहिल्यानंतरही मोदींनी त्यांना टोला लगावला.
'मागच्या ३०-४० मिनिटांपासून मी बोलत आहे, पण तिकडे करंट आत्ता पोहोचला, काही ट्यूबलाईट अशाच चालतात,' अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर निवेदन करताना मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
काँग्रेसच्या गतीनं निर्णय घेतले असते तर देशात परिवर्तन घडलं नसतं, असं विधान मोदींनी केलं. तसंच संविधान बचाओचा नारा देणाऱ्या काँग्रेसनंच संविधानाचे वाभाडे काढल्याचा घणाघाती आरोपही मोदींनी यावेळी केला.