75 th Independence day: आज भारत देश अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. लालकिल्ल्यावर पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजवंदन होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग नवव्यांदा देशाला संबोधन करणार आहेत.
देशात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध कार्यक्रमांची घोषणा करण्याची शक्यता आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त सरकारने ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाची घोषणा केली असून देशवासियांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच स्वदेशी तोफेच्या सहाय्याने 21 तोफांची सलामी देण्यात येणार आहे.
देशभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होतोय. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत हर घर तिरंगा मोहीम राबवली जातेय. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अटारी बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीटचा सोहळा रंगला जो पाहताना अनेकांच्या अंगावर शहारा आला.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशाला नवी झळाळी मिळाल्याचं दिसत आहे. ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्तानं लाल किल्ल्यावरही लक्षवेधी सजावट केली आहे. फक्त लाल किल्लाच नव्हे, तर देशाच्या विविध ऐतिहासिक ठिकाणांवरही रोषणाई आणि सजावट करण्यात आली आहे.