नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेत तब्बल १२ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार करून देशाबाहेर परागंदा झालेल्या नीरव मोदीला बेड्या ठोकण्यात आल्यानंतर आता नवी माहिती समोर आली आहे. जानेवारी २०१८ मध्ये पीएनबी घोटाळा उघड झाल्यानंतर नीरव मोदी आणि त्याचे काका मेहुल चोक्सी भारताबाहेर पळून गेले होते. यानंतर जवळपास १५ महिने नीरव मोदीने भारतीय तपासयंत्रणांपासून वाचण्यासाठी अनेक प्रयत्न करून पाहिले. सूत्रांच्या माहितीनुसार, मोदीने सुरुवातीला व्हॅनुआटू या पॅसिफिक बेटांवरील लहानशा देशाचे नागरिकत्व मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. याशिवाय, त्याने सिंगापूरचे कायमस्वरुपी नागरिकत्वही मिळवण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे आपल्या बचावासाठी सातत्याने इंग्लंडमधील बड्या कायदा कंपन्यांच्या संपर्कात होता. याशिवाय, वेळ पडल्यास नीरव मोदीने प्लॅस्टिक सर्जरी करण्याचेही ठरवले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी 'द टेलिग्राफ'ने नीरव मोदी लंडनमध्ये असल्याचे उघड केले. यानंतर भारतीय तपासयंत्रणांनी वेगाने हालचाली केल्या आणि बुधवारी स्थानिक पोलिसांनी नीरव मोदीला अचानक ताब्यात घेतले.
काही अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नीरव मोदीपेक्षा त्याचे काका मेहुल चोक्सीने अधिक तयारी केली होती. मेहुल चोक्सीने २०१७ मध्येच अँटिग्वा आणि बर्बुडा या देशांच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. ईडी आणि सीबीआयने इंटरपोल नोटीस जारी केल्यानंतर मेहुल चोक्सीने लगेचच आंतरराष्ट्रीय पोलिसांकडे आपली बाजू मांडली होती. राजकीय हेतुपोटी माझी चौकशी होत असल्याचे चोक्सीने म्हटले होते. मात्र, नीरव मोदीने तितकी खबरदारी घेतली नव्हती. त्यामुळे तो तपासयंत्रणांच्या जाळ्यात सापडला.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग ( सीबीआय) आणि अंमलबजावणी संचलनालयातील (ईडी) अधिकाऱ्यांच्या मते विजय मल्ल्यापेक्षा नीरव मोदीची प्रत्यार्पण प्रक्रिया अधिक वेगाने पार पडू शकते. यासाठी जास्तीत जास्त सहा महिन्यांचा कालावधी लागेल. विजय मल्ल्याच्या तुलनेत नीरव मोदीविरोधातील पुरावे अधिक भक्कम आहेत.