नवी दिल्ली : सामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. विना अनुदानित एलपीजी सिलेंडरचे भाव १००.५० रुपयांनी कमी झाले आहेत. एक जुलैपासून हे नवे दर लागू होणार आहेत. यामुळे दिल्लीमध्ये घरगुती वापरासाठीचा सिलेंडर ६३७ रुपयांना मिळणार आहे. विनाअनुदानित सिलेंडर घेताना ग्राहकांना एक जुलैपासून ७३७.५० रुपयांऐवजी ६३७ रुपये द्यावे लागतील.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने रविवारी याबद्दल प्रसिद्धी पत्रक काढून याबद्दल माहिती दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव घटल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे हे बदल करण्यात आले आहेत.
अनुदानित सिलेंडर घेणाऱ्या ग्राहकांना सिलेंडर घेताना बाजार मूल्य द्यावं लागतं. यानंतर अनुदान ग्राहकाच्या बँक खात्यात जमा होतं. ग्राहकांना एका वर्षात १२ अनुदानित सिलेंडर मिळतात. एलपीजी दरांमध्ये घट झाल्यामुळे ग्राहकांना १४२.६५ रुपयांचं अनुदान मिळेल. यामुळे एलपीजीचे दर ४९४.३५ रुपये होतील.