१२ वर्षापूर्वी मोफत खारे शेंगदाणे घेतले, अमेरिकेतून आल्यानंतर उधारी म्हणून मोठी रक्कम परत केली...

 आपण बाजारातुन कोणतीही वस्तु विकत घेतली की, आपल्याला त्याचे पैसे द्यावेच लागतात.

Updated: Jan 5, 2022, 03:36 PM IST
१२ वर्षापूर्वी मोफत खारे शेंगदाणे घेतले, अमेरिकेतून आल्यानंतर उधारी म्हणून मोठी रक्कम परत केली... title=

हैद्राबाद : आपण बाजारातुन कोणतीही वस्तु विकत घेतली की, आपल्याला त्याचे पैसे द्यावेच लागतात. आपल्याला कोणतीही गोष्ट फुकटात मिळत नाही. तसेच फार कमी दुकानदार असे असतात जे उधारीवरती आपल्या वस्तु देतात. परंतु अनोळखी व्यक्तीला कधीही कोणी उधारी देत नाही. परंतु एका विक्रेत्यानं एका अनोळखी व्यक्तीला फुकटात शेंगदाणे खायला दिले. ज्याचे पैसे अनेक वर्षांनी त्यांनी विक्रेत्याला व्याजासकट परत केले आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

ही घटना आंध्रप्रदेशातील यू कोथापल्ली येथील आहे. येथे समुद्रकिनारी सत्ताय्या नावाचा एक शेंगदाणा विक्रेता शेंगदाणे विकत होता. तेव्हा  2010 साली समुद्रकिनारी आपल्या कुटूंबासोबत फिरायला गेलेल्या मोहन यांनी खारे शेंगदाणे विकत घेतले आणि समुद्राचा आनंद घेत शेंगदाणे खाल्ले देखील.

परंतु जेव्हा शेंगदाणे वाल्याला पैसे देण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्याजवळ विक्रेत्याला द्यायला पैसे नाहीत. त्यांनी ही गोष्ट सत्ताय्याला सांगितली. तेव्हा त्याने पैसे नको देऊस असे सांगून फुकटात शेंगदाणे खायला दिले. पण मोहन यांचा मुलगा नेमानी प्रणव याने शेंगदाणा विक्रेत्याला पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आणि सत्ताय्यासोबत फोटो काढून ते तेथून निघून गेले.

हे कुटूंब युनायटेड स्टेट्समध्ये राहणारे म्हणजेच NRI असल्याने त्यांना या शेंगदाण्या वाल्याला लवकर पैसे  परत करता आले नाहीत.

आता, जवळपास 12 वर्षांनंतर, नेमानी प्रणव आणि त्यांची बहीण सुचिता भारतात परतले आणि त्यांनी त्या शेंगदाणा विक्रेत्याचा शोध घेऊन त्याला पैसे परत करण्याचे ठरवले. त्यांचे वडील मोहन पैसे परत करण्यास उत्सुक होते आणि त्यांनी त्या शेंगदाणा विक्रेत्याचा शोध घेण्यासाठी सुरूवात केली. त्यावेळेस मोहन यांनी त्यांचे मित्र चंद्रशेखर रेड्डी यांची मदत घेतली. चंद्रशेखर रेड्डी हे काकीनाडा शहराचे आमदार आहेत. 

या आमदाराने फेसबुकवर शेंगदाणा विक्रेत्याची एक पोस्ट टाकली. ज्यानंतर या शेंगदाणा विक्रेता सत्ताय्या याच्या मुळ गावातील म्हणजे नागुलापल्ली मधील काही लोकांनी आमदारांची पोस्ट पाहून त्यांना यासंबंधात माहिती दिली.

या लोकांशी संपर्क साधला असता त्यांना समजले की तो शेंगदाणा विक्रता आता या जगात नाही. त्यानंतर या भावंडांनी त्याच्या कुटुंबाला 25 हजार रुपये देण्याचे ठरवले आणि दोन्हीही भावंडांनी त्याच्या कुटूंबाला भेट देऊन हे पैसे परत केले.

हा व्यक्ती आपल्या दिलेल्या शब्दाशी प्रामाणिक राहिला आणि त्याने आपला शब्द पूर्ण केला, ज्यामुळे सोशल मीडियावर या घडनेची भलतीच चर्चा होत आहे. तसेच सोशल मीडियावरती या भावंडांचा फोटो देखील व्हायरल होत आहे.