Omicron new sub-variant in India : एकीकडे दिवाळीची जोरदार तयारी सुरु असताना भारतीयांच्या चिंता पुन्हा वाढल्या आहेत. 2 वर्ष कोरोनामुळे अनेक सण साजरे करता आले नाही. पण आता दिवाळीआधी पुन्हा एकदा कोरोनाने टेन्शन वाढवलं आहे. एकीकडे देशातील कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना भारतात ओमायक्रॉनचा (Omicron new verient) नवा व्हेरिएंट दाखल झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, ओमायक्रॉनचा BA.5.1.7 विषाणू खूप वेगाने पसरतो. गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरने भारतात BF.7 उप-प्रकारचे पहिले प्रकरण शोधून काढले आहे. (Pandemic alert Omicron new threat of sub variant BF.7)
आरोग्य तज्ञांनी या नंतर सावधगिरीचा सल्ला दिला आहे. BF.7 आणि BA.5.1.7 प्रकारांमुळे चीनमध्ये पुन्हा कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. ओमायक्रॉनचे नवीन उप-प्रकार ba.5.1.7 आणि bf.7, अत्यंत संसर्गजन्य म्हणून ओळखले जातात आणि ते आता जगभरात पसरत आहेत. (Covid-19 case in India)
Lockdown आणि निर्बंध शिथिल केल्यानंतर आता दिवाळीच्या तोंडावर हा विषाणू आढळल्याने प्रशासनाच्या चिंता वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी सावधगिरीचा सल्ला दिला आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे आणि लक्षणे दिसल्यास ताबडतोब आयसोलेट होण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
यूके, जर्मनी आणि फ्रान्स सारख्या युरोपीय देशांमध्ये या प्रकाराचे सुमारे 15 ते 25 टक्के प्रकरणे आढळली आहेत. या नवीन व्हेरियंटच्या संक्रमणक्षमतेतही वाढ झाली आहे. कारण हा प्रकार पूर्णपणे लसीकरण केलेल्या लोकांना देखील संक्रमित करू शकतो. त्यामुळे याचा धोका आहे.
या प्रकारांची लक्षणे जुन्या प्रकारासारखीच असतील. यात अंग दुखणे हे मुख्य लक्षण आहे. ज्या लोकांना त्याची लक्षणे दिसत नाहीत आणि जर त्यांना संसर्ग झाला असेल तर ते देखील संसर्ग पसरवू शकतात.
नवीन प्रकारामुळे नवीन लाटेची शक्यता असल्याचं देखील म्हटलं जात आहे. कारण कुठेही निर्बंध नाहीत आणि लोकं मास्क शिवाय वावरत आहेत. गर्दीच्या वेळी हा विषाणू अधिक लोकांना संसर्ग करु शकतो. त्यात हिवाळा देखील जवळ येत आहे, त्यामुळे घसा खवखवणे आणि सर्दी या समस्या देखील वाढण्याची शक्यता आहे.
लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. आपले हात साबणाने आणि पाण्याने चांगले धुवा आणि वेळोवेळी आपले हात स्वच्छ ठेवा. मास्क घालायला सुरुवात करा. त्यामुळे ते प्रदूषणही टाळू शकतात. कोणतेही लक्षण दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका.