एक दिवस गांधी घराण्याला तुरुंगात जावेच लागेल- नरेंद्र मोदी

मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर काँग्रेसने श्रद्धांजली वाहणे आणि मेणबत्ती मोर्चे काढण्यापलीकडे काय केले? 

Updated: Jan 30, 2019, 09:51 PM IST
एक दिवस गांधी घराण्याला तुरुंगात जावेच लागेल- नरेंद्र मोदी title=

अहमदाबाद: गांधी घराण्याने न्यायालयाच्या कितीही चकरा मारल्या तरी एक दिवस त्यांना तुरुंगात जावेच लागेल, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते बुधवारी सुरत येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांना थेट इशारा दिला. यावेळी मोदी यांनी म्हटले की, गांधी घराण्याच्या जवळपास चार पिढ्यांनी देशावर राज्य केले. त्यांचे नाव घेतले की देशातील लोक थरथर कापायचे. मात्र, कोणीही कल्पना केली नव्हती की, चार पिढ्या देशावर राज्य करणाऱ्यांना एक चहावाला आव्हान देईल. तुम्हाला माहितीच असेल की, गांधी घराणे सध्या जामिनावर आहेत. त्यांचे अनेक सहकारी देखील न्यायालयाचे उंबरे झिजवत आहेत. मात्र, त्यांनी न्यायालयाच्या कितीही चकरा मारल्या तरी एक दिवस गांधी घराण्याला तुरुंगात जावेच लागेल, असे मोदी यांनी सांगितले. 

या भाषणात मोदी यांनी मुंबईवरील २६\११च्या दहशतवादी हल्ल्यावरूनही काँग्रेसला लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर काँग्रेसने श्रद्धांजली वाहणे आणि मेणबत्ती मोर्चे काढण्यापलीकडे काय केले? आमच्या सरकारच्या काळात उरी हल्ला झाला होता. त्यानंतर काय घडले, हे तुम्हाला माहितीच आहे. हाच देशातील मोठा बदल आहे. उरी हल्ल्यानंतर आम्हाला झोप लागत नव्हती. त्यावेळी भारतीय जवानांच्या मनात क्रोधाचा जो अग्नी धगधगत होता तोच माझ्याही मनात धगधगत होता. त्यामुळेच सर्जिकल स्ट्राईक होऊ शकला, असे मोदी यांनी सांगितले.