नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी आणखी 9 विमानं जाणार आहेत. आज दिल्लीत 249 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचं विमान दाखल झालं. पुढील तीन दिवसांत भारताची 9 विमानं युक्रेनसाठी उड्डाणं घेणार आहेत. भारताच्या ऑपरेशन गंगामध्ये इंडिगो एअरलाईन्सही सहभागी होणार आहेत. एअर इंडिया आणि इंडिगोची विमानं भारतीयांना बुडापेस्ट आणि बुखारेस्टमधून मायदेशी आणणार आहेत.
युक्रेनमध्ये अडकलेल्यांसाठी स्वतंत्र ट्विटर हँडल सुरू करण्यात आलं आहे. @opganga नावाच्या या हँडलवर थेट माहिती देता येणार आहे. भारतीयांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं हे पाऊल उचललं आहे. युक्रेनमध्ये अजूनही हजारो भारतीय अडकलेले आहेत.
युक्रेन संकटावर पंतप्रधान मोदींनी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत भारतीयांच्या सुटकेसाठी मोदींनी चर्चा केली. युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय अडकले आहेत. त्यातील 18 हजार विद्यार्थी आहेत. युद्ध पेटल्यानं भारतीय संकटात अडकले आहेत. त्यामुळे भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.