नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधल्या महिलांसाठी भारतीय लष्करानं अनोखं पाऊल उचललं आहे. यामुळे जम्मू काश्मीरमधल्या पुँछमधल्या छोट्या गावातल्या महिलांवरच्या चेहेऱ्यावर हसू फुललं आहे. भारतीय लष्करानं जम्मू काश्मीर खोऱ्यातल्या पुंछमधल्या मंगनेर गावात, स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं एक बेकरी सुरु केली आहे. सध्या या बेकरीत काश्मीरमधल्या १२ स्थानिक महिला काम करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्या महिला घरी राहूनच काम करु इच्छितात, त्यांनाही यात सहभागी करुन घेण्यात आलं आहे.
'ऑपरेशन सद्भावना' अंतर्गत ही बेकरी सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुण्यातल्या एका बेकरीचाही यात सहभाग आहे. पुँछमधल्या गावातल्या बेकरीत तयार झालेले खाद्यपदार्थ, पुण्यातल्या बेकरीत विकले जातात. भारतीय लष्कराच्या या उपक्रमाने महिला आणि गाव दोघेही खूष आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, समोर आलेल्या सरकारी आकड्यांनुसार, काश्मीरमध्ये शिक्षित बेरोजगारांची संख्या सहा लाखांहून जास्त आहे.