नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या गुजरात राज्यसभा निवडणुकीत एका जागेवर तसेच, दिल्ली विधानसभेच्या बवाना येथील पोटनिवडणुकीत पक्षाला नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे देशात भाजपच्या विरोधात वातावरण निर्मिती होत आहे, अशी चर्चा सुरू आहे. असे असले तरी आगामी गुजरात विधासभा निवडणुकीबाबतचे ओपिनियन पोल काही निराळेच अंदाज वर्तवत आहेत.
एबीपी न्यूजचा आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीबाबतचा ओपिनियन पोल प्रसिद्ध झाला आहे. त्यात भाजपचे कमळ केवळ विजयीच नव्हे तर, मोठ्या फरकाने चौथ्यांदा सत्तेत विराजमान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गुजरातमध्ये चारही विभागात एकूण १८२ जागांसाठी होणाऱ्या मतदानात ५९ टक्के इतकी मते भाजपच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, अगोदरच पराभवाच्या गर्तेत असलेल्या कॉंग्रेसचा पाय आणखीच खोलात जाण्याची चिन्हे आहेत. आगामी निवडणुकीत कॉंग्रेसला केवळ ३३ टक्के मतांवरच समाधान मानावे लागेल, असे ओपिनियन पोलचे म्हणणे आहे.
कच्छ-सौराष्ट्रमध्येही भाजपचा झेंडा फडकण्यास संधी आहे. तसेच, इथे ५४ जागांसाठी भाजपला ६५ तर, कॉंग्रेसला २६ जागांवर समाधान मानावे लागू शकते. मध्य गुजरातमधल्या ३० जागांसाठी भाजप आणि कॉंग्रेस अनुक्रमे ५६, ३० टक्के मते मिळवू शकते. तर, याशिवाय दक्षिण गुजरातमधल्या ३५ जागांवर भाजप ५४ तर, कॉंग्रेसच्या खात्यात केवळ २७ टक्के मते पडू शकतात असा ओपिनियन पोलचा अंदाज आहे.
एबीपी न्यूजने म्हटल्यानुसार, गुजरातमध्ये आज रोजी विधानसभा निवडणूक झाली तर, भाजपच्या खिशात १४४ ते १५२ जागा पडू शकतात. सध्या भाजप ११५ जागांवर सत्ता राखून आहे. कॉंग्रेसची गुजरातमधील हालत ही पहिल्यापेक्षा वाईट होण्याची चिन्हे असून, आज निवडणूक झाली तर कॉंग्रेसला केवळ २६ ते ३२ जागांवर समाधान मानावे लागू शकते, असेही ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, १८२ जागा असलेल्या गुजरात विधानसभेसाठी ही १४वी निवडणूक आहे.