ओपिनियन पोल: २०१९ लोकसभा निवडणुकीत त्रिशंकु स्थिती

२०१९ लोकसभा निवडणुकीत त्रिशंकु स्थितीची शक्यता

Updated: Jan 24, 2019, 07:06 PM IST
ओपिनियन पोल: २०१९ लोकसभा निवडणुकीत त्रिशंकु स्थिती title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक आहेत. सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी विजयासाठी कंबर कसली आहे. सत्तेच्या चाव्या ज्यांच्या हातात जातील अशा छोट्या राजकीय पक्षांना आपल्याकडे खेचण्यासाठी राष्ट्रीय पक्ष प्रयत्न करत आहेत. २०१९ मध्ये कोणाचं सरकार येणार असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइट्सने केलेल्या सर्व्हेनुसार प्रादेशिक पक्ष सत्तेत कोणाला बसवायचं हे ठरवणार आहेत. त्यामुळे त्यांना आता विशेष महत्त्व येणार आहे. 

सर्व्हनुसार २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये जागांमध्ये मोठा फरक पाहायला मिळणार आहे. २०१४ मध्ये एनडीएला ३८ टक्के मतं मिळाली होती. तर युपीएला २३ टक्के मतं मिळाली होती. इतर पक्षांच्या खात्यात ३९ टक्के मतं गेली होती. इतर पक्षांना मिळालेल्या मतांमुळे युपीएला फटका बसला होता आणि भाजप सत्तेत आली होती. पण ५ वर्षात लोकांचा कल बदलत गेला. नुकताच केलेल्या सर्व्हेमध्ये एनडीएला ३५ टक्के तर युपीएला ३३ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांना ३२ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.

वोट शेअर जर जागांमध्ये पाहिले तर १६ व्या लोकसभा निवडणुकीत त्रिशंकु स्थिती दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नसल्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान भाजपला होणार आहे. एनडीएला ९९ जागांचा फटका बसणार आहे. सर्व्हनुसार एनडीएला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २३७ जागा मिळण्याची शक्यता आहे. यूपीएला मात्र फायदा होतांना दिसत आहे. पण युपीएला सत्तेत येण्याचा मार्ग दिसत नाही आहे. युपीएच्या १०६ जारा वाढताना दिसत आहे. त्यामुळे भाजपला १६६ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्षांना देखील १५३ ऐवजी १४० जागा मिळण्याची शक्यता आहे.

सर्व्हेनुसार २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये एनडीएला ३ टक्के मतांचं नुकसान होणार आहे. युपीएला मात्र १० टक्के मतांचा फाय़दा होणार आहे. २०१९ मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार हे या सर्व्हेतून समोर आलं आहे.

कोणाला किती जागा मिळणार?
 

                    2014     2019       +/-

एनडीए          336      237        -99

यूपीए             60       166       +106

अन्य             153      140         -13

एनडीएमधील पक्ष : भारतीय जनता पक्ष, ऑल इंडिया एन रंगास्वामी काँग्रेस, अपना दल, बोडो पीपुल्स फ्रंट, डीएमडीए, जेडीयू, एलजेपी, नागा पीपल्स फ्रंट, पीएमके, नॅशनल पीपल्स पार्टी, आरपीआय(आठवले गट), शिरोमणी अकाली दल, सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट, शिवसेना

यूपीएमधील पक्ष : काँग्रेस, डीएमके, जेडीएस, नॅशनल कॉन्फ्रेंस, जेएमएम, केरळ काँग्रेस (मणी), आययूएमएल, एनसीपी, आरजेडी, आरएलडी, टीडीपी

इतर पक्ष : आम आदमी पक्ष, असम गण परिषद, अन्नाद्रमुक, फॉरवर्ड ब्लॉक, तृणमूल काँग्रेस, एआययूडीएफ, बिजू जनता दल, सीपीआय, सीपीआय-एम, इंडियन नॅशनल लोकदल, पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टी, केरळ काँग्रेस(जोसेफ), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एनएलपी, आरएसपी, टीआरएस, वायएसआर काँग्रेस, अपक्ष, सपा-बसपा-आरएलडी आघाडी