नवी दिल्ली: पत्रकार पल्लवी गोगोई यांनी एम.जे. अकबर यांच्याशी सहमतीने संबंध ठेवल्याचा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी ट्विट करून यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. अकबर आणि माझ्यातील संबंध सहमतीने नव्हते. बळजबरी आणि पदाचा गैरवापर करून त्यांनी माझ्याशी संबंध ठेवले, त्याला माझी सहमती नव्हती. मी सत्यावर ठामच राहणार आहे. जेणेकरून अकबर यांनी लैंगिक शोषण केलेल्या अन्य महिला पुढे येण्याचे धाडस दाखवतील, असे गोगोई यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पल्लवी गोगोई यांनी वॉशिंग्टन पोस्टमध्ये लेख लिहून अकबर यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. २३ वर्षांपूर्वी एशियन एजमध्ये अकबर यांच्यासोबत काम करत असताना अकबर यांनी आपल्यावर बलात्कार केला होता, असा पल्लवी यांचा आरोप आहे.
मात्र, यानंतर एम.जे. अकबर यांनी पल्लवी यांचे आरोप खोटे असल्याचा दावा केला होता. उलट आमच्या दोघांमधील संबंध सहमतीनेच होते. अकबर यांची पत्नी मलिका यांनीही पल्लवी गोगोई खोटे बोलत असल्याचे म्हटले होते.
My statement: pic.twitter.com/7xoADdIHoX
— Pallavi Gogoi (@pgogoi) November 2, 2018
पल्लवी यांच्या खोटारडेपणामागचे कारण मला माहीत नाही मात्र, तिने जो आरोप केला आहे तो खोटा आहे हे मी ठामपणे सांगू शकते. २० वर्षांपूर्वी पल्लवी आमच्या घरात वादाचं कारण बनली होती. ती उघडपणे माझ्यादेखत माझ्या पतीशी लगट करायची. अकबर आणि तिच्यातील सबंधांमुळे कुटुंबातील कलह टोकाला गेला होता, असे मल्लिका यांनी सांगितले होते.
'एशियन एज'साठी पत्रकारिता करत असताना जयपूर येथील एका हॉटेलमध्ये एम.जे. अकबर यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचे पल्लवी गोगोई यांनी म्हटले होते. 'मी त्यावेळी २३ वर्षांची होती. एम. जे. अकबर हे त्याकाळी आघाडीचे संपादक होते. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार असल्याने मी आनंदात होते. ते वरिष्ठ पत्रकार असल्याचे नेहमीच दाखवून द्यायचे. ते चुकांवरून अनेकांवर डाफरायचे, शेलक्या शब्दांत आमचा उद्धार करायचे. मात्र, या सगळ्यातून काही शिकायला मिळेल, या आशेने मी हे सर्व सहन करत होते', असे त्या म्हणाल्या.
१९९४ साली माझ्यावर 'एशियन एज'च्या संपादकपदाची जबाबदारी देण्यात आली. एकदा या पानावरील मजकुरासंदर्भात चर्चा करायला मी त्यांच्या केबिनमध्ये गेले होते. त्यावेळी अकबर यांनी माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मी कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली आणि तिथून पळ काढला. माझी सहकारी तुशिता हिला मी हा प्रसंग सांगितला. मात्र, याबद्दल आम्ही कुठेही वाच्यता केली नाही.
यानंतर एका मासिकाच्या लाँचिंगसाठी आम्ही मुंबईत गेलो असताना त्यांनी मला पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून घेतले. तेव्हाही त्यांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापासून बचाव करण्याच्या नादात माझ्या चेहऱ्यावर ओरखडेही उमटले होते. मात्र, मी तेथूनही पळ काढला. यानंतर अकबर यांनी या प्रकाराची वाच्यता केल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी मला दिली.
या प्रसंगानंतर मी अकबर यांच्याशी कमीतकमी संबंध येईल, यादृष्टीने काम करायचा प्रयत्न केला. त्यासाठी मी वार्ताहर म्हणून फिल्डवर जायला लागले. मी एकदा अशाच एका वृत्तांकनासाठी जयपूरमध्ये गेले होते. त्यावेळी अकबर मला कोणतीही कल्पना न देता जयपूरमध्ये आले. त्यांनी मला या बातमीविषयी चर्चा करण्यासाठी हॉटेलवर बोलवून घेतले. हॉटेलच्या खोलीत त्यांनी माझे कपडे अक्षरश: खेचून काढले आणि माझ्यावर बलात्कार केला. त्यावेळी मी शरमेने प्रचंड घाबरले होते. त्यामुळे पोलिसांकडे तक्रार करू शकले नाही.
या प्रसंगानंतर एम.जे अकबर यांनी जाणुनबुजून माझी बदली अमेरिकेतील कार्यालयात केली. जेणेकरून याठिकाणी मी एकटी पडेन आणि येथे आल्यानंतर माझ्यासोबत हवे ते करता येईल, असा अकबर यांचा उद्देश होता. मी एकदा कार्यालयातील पुरुष सहकाऱ्याशी बोलत असताना त्यांनी मला बघितले. यानंतर ते माझ्यावर प्रचंड चिडले. त्यांनी मला मारहाण केली. काही दिवसांतच त्यांनी मला भारतात परत येण्यास सांगितले.
अखेर हा ताण असह्य झाल्याने मी कुटुंबीयांशी चर्चा करून 'एशियन एज'ची नोकरी सोडली. यानंतर मला डाऊ जोन्स येथे नोकरी मिळाली. सध्या मी अमेरिकेत स्थायिक आहे. काही दिवसांपूर्वी महिला पत्रकारांच्या आरोपानंतर एम.जे. अकबर यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हा मी माझ्या पतीशी चर्चा करून माझ्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला, असे पल्लवी गोगोई यांनी सांगितले.