कोलकत्ता : कोलकत्ता मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सिजोफ्रेनियाने ग्रस्त असलेल्या ४८ वर्षांच्या रुग्णाच्या पोटातून ६३९ खिळे काढले. त्यापैकी एका खिळ्याचे वजन १ किलोग्रॅमपेक्षा अधिक होते. खूप काळापासून ही व्यक्ती खिळे खात होती.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णाचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याने तो असे कृत्य करत होता. या रुग्णाचे ऑपरेशन केलेले डॉक्टर सिद्धार्थ बिश्वास यांनी सांगितले की, "रुग्ण हा गोबरदंगा येथील रहिवासी आहे. हा सिजोफ्रेनिया ने ग्रस्त आहे आणि गेल्या खूप काळापासून त्याने खिळे आणि माती खाल्ली आहे." डॉक्टरांनी सांगितले की, "आम्ही पोट सुमारे १० सेंटीमीटर लांब कापलेआणि चुंबकाच्या मदतीने सगळे खिळे काढले."
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या व्यक्तीच्या पोटात दुखू लागले होते. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि एक्स-रे तून पोटात खिळे असल्याचे समोर आले. डॉक्टरांनी लगेचच कोलकत्ता मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये हलवण्यास सांगितले. अनेक तपासण्यांनंतर पोटात दोन अडीच इंचाचे खिळे असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आता रुग्णाची स्थिती स्थिर आहे. मात्र तो पूर्णपणे फिट आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. मात्र हा प्रकार उघडकीस आल्याने अनेकजण हैराण आहेत.