नवी दिल्ली: आगामी काळात देशातील निवडणुका शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवर लढल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणाराच यापुढे देशावर राज्य करेल, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. ते शुक्रवारी दिल्लीतील शेतकरी मोर्चाच्या व्यासपीठावर बोलत होते. यावेळी शेट्टी यांनी म्हटले की, भविष्यात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणारी व्यक्तीच देशावर राज्य करणार आहे. त्यामुळे शेतकरी ज्यांना पाठिंबा देतील, त्याचीच सत्ता येईल आणि जे कोणी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करील, त्याचे नुकसानच होईल, असे शेट्टी यांनी सांगितले.
हा मोर्चा म्हणजे सरकारला दिलेला अल्टिमेटम आहे. सध्याच्या शेतकरी धोरणामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. सरकार जीएसटीला मंजुरी मिळविण्यासाठी मध्यरात्री संसदेचे विशेष अधिवेशन बोलवते. यासाठी दोन्ही सभागृह एकत्र येतात आणि जीएसटीला मंजुरी मिळते. मग शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन का नाही, असा सवालही राजू शेट्टींचा सरकारला विचारला.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा आणि कर्जमाफी या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढला आहे. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, राष्ट्रीय किसान मजदूर संघटना, किसान एकता संघटना, भारतीय किसान युनियन अशा 208 संघटनांचे सदस्य शेतकऱ्यांचा समावेश आहे.