PM Modi On Monsoon Session 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी दिल्लीमध्ये संसद भवनासमोर पत्रकारांशी संवाद साधला. या पावसाळी अधिवेशनामध्ये अनेक विधेयकं मांडली जाणार असल्याचा सांगितलं. मात्र त्याचबरोबर ही सर्व विधेयकं लोकांशी संबंधित आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर सविस्तर चर्चा व्हावी अशी अपेक्षा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे.
"तुम्हा सर्वांचा स्वागत आहे. श्रावणाचा पवित्र महिना सुरु आहे. यंदा तर अधिकमास आहे. त्यामुळे श्रावणाचा कालावधी अधिक आहे. श्रावण महिना पवित्र संकल्पांसाठी, कार्यासांठी उत्तम मानला जातो. लोकशाहीच्या मंदिरामध्ये श्रावणाच्या पवित्र महिन्यात भेट आहोत तर या लोकशाहीच्या मंदिरात अनेक चांगली काम करण्यासाठी याहून अधिक योग्य मुहूर्त सापडणार नाही. या सत्राचा जनहितासाठी सर्वाधिक वापर केला जाईल. संसदेची आणि प्रत्येक खासदाराची ही जबाबदारी आहे. यासंदर्भातील कायदे बनवणे आणि त्याची चर्चा करणं आवश्यक आहे. जेवढी चर्चा होईल, जेवढी दिर्घ चर्चा होईल तितकेच दुरोगामी परिणाम करणारे निर्णय घेता येतील. संसदेत येणारे खासदार हे लोकांशी जोडलेले असतात. ते लोकांची सुख, दु:ख जाणतात. त्यामुळे चर्चा होते तेव्हा त्यांच्याकडून जे विचार मांडले जातात ते लोकांशी जोडलेले असतात. त्यामुळे समृद्ध चर्चा होतात आणि निर्णय सशक्त आणि परिमाणकारक असता. म्हणून मी सर्व राजकीय पक्षांना, खासदारांना या सत्राचा वापर करुन लोकहिताची कामं पुढे नेऊयात," असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.
"या सत्रामध्ये आणली जाणारी विधेयके ही थेट लोकांशी संबंधित असणार आहेत. आपली तरुण पिढी जी पूर्णपणे डिजीटल विश्वाचं नेतृत्व करत आहे. त्यामुळेच डेटा प्रोटेक्शन बील प्रत्येक नागरिकाला नवीन विश्वास देणारं विधेयक आहे. जगात भारताची प्रतिष्ठा वाढवणारं विधेयक आहे. नॅशनल रिसर्च फाऊण्डेशन म्हणजे एनआरएफ नवीन शैक्षणिक धोरणांसंदर्भातील महत्त्वाचं आहे. संशोधनाला, नव्या विचारांना या माध्यमातून बळ मिळणार आहे. जगामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याचं सामर्थ्य असणाऱ्या आपल्या तरुण पिढीसाठी मोठ्या संधी उपलब्ध करुन देणारं हे सत्र आहे. जनविश्वास बिल सामान्य व्यक्तींवर विश्वास ठेवणे, अनेक गुन्हे डिक्रिमिनलाइज करण्यासंदर्भात आपल्याला पुढे घेऊन जाणारं बिल आहे. जुने कायदे रद्द करण्यासंदर्भातील बदलांचा एका विधेयकामध्ये समावेश करण्यात आला आहे. आपल्याकडे अनेक शतकांपासून परंपरा राहिली आहे की जेव्हा वाद होतात तेव्हा मध्यस्थी केली जाते. यालाच कायदेशीर साच्यात बसवणारं मिडिएशन बिल आणण्यासाठी हे सत्र महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक विषयांवर एकत्र बसून चर्चा करण्याची ही संधी आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
नक्की वाचा >> "कोणालाच सोडणार नाही"; विवस्त्र करुन महिलांची धिंड काढण्याच्या प्रकरणावरुन PM मोदींचा इशारा
डेंटल मिशनसंदर्भात म्हणजेच डेंटल कॉलेजसंदर्भातील एक विधेयक या सत्रात मांडलं जाणार आहे. मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणारं हे विधेयक असेल. अशी अनेक विधेयक संसदेमध्ये मांडली जाणार आहेत. ही विधेयक लोकांसाठी, तरुणांच्या विकासासाठी, देशाच्या विकासाठी आहेत. मला विश्वास आहे की, संसदेमध्ये गंभीर्याने या विधेयकांवर चर्चा करुन राष्ट्रहिताची धोरणे वेगाने लागू करता येईल, असं मोदी म्हणाले.