कांद्याचे पैसे मोदींना मनी ऑर्डर करणाऱ्या 'त्या' शेतकऱ्याने काय केले वाचा...

साठे यांनी काही दिवसांपूर्वी कांद्याच्या विक्रीतून त्याला मिळालेले अवघे १०६४ रुपये नरेंद्र मोदी यांना मनी ऑर्डरने पाठवले होते.

Updated: Dec 13, 2018, 05:41 PM IST
कांद्याचे पैसे मोदींना मनी ऑर्डर करणाऱ्या 'त्या' शेतकऱ्याने काय केले वाचा... title=

नवी दिल्ली - कांद्याला तुटपुंजा भाव मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील एका चिडलेल्या शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच ते पैसे मनी आर्डरने पाठवले होते. हा विषय राष्ट्रीय माध्यमांमध्ये एकदम चर्चेचा विषय बनला होता. पंतप्रधान कार्यालयाने ते पैसे न स्वीकारता संबंधित शेतकऱ्याला परत पाठवले आहेत. संजय साठे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. साठे यांनी काही दिवसांपूर्वी कांद्याच्या विक्रीतून त्याला मिळालेले अवघे १०६४ रुपये नरेंद्र मोदी यांना मनी ऑर्डरने पाठवले होते. शेतकरीविरोधी धारणाचा निषेध म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले होते. 

संजय साठे हे नाशिक जिल्ह्यातील निफाडचे आहेत. त्यांनी आपला ७५० किलो कांदा बाजार समितीत विक्रीला आणला. त्याचे अवघे १०६४ रुपयेच त्यांना मिळाले होते. त्यामुळे त्यांनी चिडून ते पैसे मनी ऑर्डरने मोदींना पाठवून दिले. पण पंतप्रधान कार्यालयाडून त्याची मनी ऑर्डर स्वीकारण्यात आली नाही आणि ती परत पाठवण्यात आली. याबद्दल स्थानिक टपाल कार्यालयाने साठे यांना सांगितल्यानंतर सोमवारी त्यांनी निफाडमधील टपाल कार्यालयात जाऊन आपले पैसे परत घेतले. मला केवळ शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधायचे होते. बाकी माझा कोणताही उद्देश नव्हता, असे साठे यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले.

साठे यांना त्यांच्या कांद्याला निफाडच्या बाजारात प्रतिकिलो फक्त १.४० किलो इतकाच भाव मिळाला होता. पंतप्रधानांकडील मदत निधीमध्ये जमा करण्यासाठीच हे पैसे आपण मनी ऑर्डरने पाठवले होते, असे साठे यांनी सांगितले होते. कांदा उत्पादकांच्या कष्टांना योग्य भाव मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार योग्य पावले उचलेल, अशी आपल्याला अपेक्षा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.